विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रथमच मुंबई – नागपूर मार्गावर शिवनेरी वातानुकूलित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ डिसेंबर ते ५ जानेवारी या काळासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईतून मोठय़ा संख्येने प्रवाशी नागपूरला जात असतात. त्यामुळे महामंडळाची ६ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान शिवनेरी वातानुकूलित सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
महामंडळाने २० डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान मुंबई ते पणजी मर्गावर शिवनेरी वातानुकूलित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाताळ आणि नववर्षांनिमित्त ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
’मुंबई सेंट्रल येथून दुपारी ३ वाजता सुटणारी बस ९०० कि.मी.चा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. ही बस दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्रीपार्क, वाशी हायवे, नेरूळ फाटा, कोकणभवन, खालघर, कळंबोली हायवे, शिवाजी नगर (पुणे), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, चिखली, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती मार्गे नागपूरला पोहोचेल.
’परतीच्या प्रवासाठी नागपूर येथून सायंकाळी ६.३० वाजता सुटलेली बस दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबई ते नागपूर प्रवासभाडे २,३७० रुपये आकारण्यात येणार आहे.