16 January 2021

News Flash

..आता ‘एमयुटीपी-३’ प्रकल्पांना गती

सामंजस्य करारावर स्वाक्षरी

संग्रहित छायाचित्र

 

एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) एमयुटीपी-३ मधील पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्गिका, ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदीरकरणासह अन्य प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. एमयुटीपी-३ साठी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एमआरव्हीसी, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्यात ‘वर्षां’ निवासस्थानी यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात कोणतीही अडचण राहणार नाही.

डिसेंबर २०१६ मध्ये १० हजार ९४७ कोटी रुपयांच्या एमयुटीपी-३ ला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली होती. मंजुरीनंतरही एमयुटीपी-३ मधील महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली नाही. यातील मध्य व पश्चिम रेल्वेवरील दोन स्थानकादरम्यान रुळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणे आणि ऐरोली ते कळवा उन्नत प्रकल्पातील दिघा स्थानकाच्या कामाला काही प्रमाणात सुरुवात करण्यात आली. परंतु या कामांनाही वेग मिळू शकलेला नाही. त्यात एमयुटीपी-३ प्रकल्पातील महत्वाच्या प्रकल्पांचे काम मार्गी लागावे, त्यांना त्वरीत निधी प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्यासोबत सामंजस्य करारही होणे महत्त्वाचे होते.

त्यानुसार गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी सांगितले. यामुळे प्रकल्पांच्या कामांना वेग येईल. एमयुटीपी-३ मधील पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्गिका आणि विरार ते डहाणू तिसऱ्या आणि चौथी मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले.

एमयुटीपीमधील प्रकल्पांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेकडूनही ३,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून त्याचाही करार करण्यात येणार असल्याचे खुराना यांनी सांगितले. राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा-२ च्या धर्तीवर ५०:५० टक्के आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे. सामंजस्य करार करताना नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव आदी उपस्थित होते.

प्रकल्प आणि खर्च..

पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्गिका (२८ किमी.) – २,७८३ कोटी, ऐरोली ते कळवा उन्नत रेल्वे मार्ग (३.५ किमी) – ४७६ कोटी, विरार ते डहाणू मार्गाचे चौपदरीकरण (६३ किमी) – ३,५७८ कोटी, ४७ वातानुकूलित लोकल – ३,४९१ कोटी, मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर रुळ ओलांडण्याचे प्रकार रोखणे – ५५१ कोटी, तांत्रिक कामे- ६९ कोटी रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:37 am

Web Title: now speed up mutp 3 projects abn 97
Next Stories
1 अधिकारी नेमल्याने मुंबईतील रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध
2 केईएम रुग्णालयात तरुणाची आत्महत्या
3 राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत
Just Now!
X