News Flash

आता खड्डय़ांच्या ‘प्रक्षेपका’तून दगडांची उड्डाणे!

रस्त्यावर खड्डय़ात दुचाकी आपटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच असे खड्डे आता रस्त्यांशेजारून ये-जा करणाऱ्यांसाठीही

| August 19, 2013 01:31 am

रस्त्यावर खड्डय़ात दुचाकी आपटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच असे खड्डे आता रस्त्यांशेजारून ये-जा करणाऱ्यांसाठीही धोकादायक ठरत आहेत. डोंबिवलीच्या पूर्व भागातील फडके रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी टाकलेल्या दगडांवरून बस गेल्यानंतर त्यातील एक दगड उडून थेट रस्त्याच्या कडेला असलेला जाहिरात फलक फाडून त्यामागील दुकानावर जाऊन आदळला. यात दुकानाची काच फुटली, तर या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन महिला बालंबाल बचावल्या.
रविवारी सकाळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या सीमा तर्खडकर आणि सुप्रिया पटवर्धन या दोघी फडके रस्त्याच्या कडेला बोलत उभ्या होत्या. त्या वेळी या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या एका बसचे चाक खड्डय़ातून गेले असता तेथील एक मोठा दगड उडून दोन्ही महिलांच्या तोंडासमोरून मिठाईच्या दुकानावर आदळला. यात दुकानाच्या काचेच चुराडा झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी असा प्रकार प्राणघातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. फडके रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये खडी, दगडगोटे टाकण्यात आले आहेत. मात्र, ते नीट न बसवण्यात आल्याने दगड उडण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, डोंबिवलीतील ‘सक्रिय नागरिक मंच’चे निमंत्रक प्रा. उदय कर्वे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे पालिकांना खड्डय़ांबाबतच्या सुधारणांबाबत विचारणा केली आहे. त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील खड्डय़ांची दखल न्यायालयाने घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा विचार त्यांनी चालविला आहे.

खड्डय़ांमुळे नव्हे.. भरधाव रिक्षेमुळे महिलेचा मृत्यू  
डोंबिवलीत शुक्रवारी खड्डय़ात दुचाकी आपटून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्या नायक यांचा मृत्यू वेगवान रिक्षापासून बचाव करताना पडल्याने झाल्याचा खुलासा कल्याण डोंबिवली महापालिकेने केला आहे. पालिकेचे शहर अभियंता पाटीलबुवा उगले व साहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी रविवारची सुट्टी असतानाही पालिका मुख्यालय गाठून प्रसारमाध्यमांसमोर पालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, ‘रिक्षा चुकवण्याच्या प्रयत्नात नायक यांना अपघात झाला’ असा खुलासा पालिकेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:31 am

Web Title: now stone launches from pothole launchers
Next Stories
1 अमेरिकन महिलेवर लोकलमध्ये हल्ला
2 मुलुंड येथून नक्षलवाद्याला अटक
3 आणखी एका जवानाचा मृतदेह हाती लागला
Just Now!
X