करोना प्रादुर्भावाचा वाढता आलेख रोखण्यासाठी ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी लागूच असून यामागील गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. आता अशा व्यक्तींवर आणखी कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत. अनावश्यक फिरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त केली जातील, असे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले.

उत्तर मुंबईत करोनाचे रुग्ण टाळेबंदी शिथिल केल्यानंतर प्रामुख्याने वाढले. आपण या परिसराला भेट दिली. पोलिसांशी चर्चा केली. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर लोकांनी ते गांभीर्याने घेतले नाही. पुन्हा आम्ही या विशिष्ट भागांत पुन्हा कडक टाळेबंदी केली तेव्हा करोना रुग्णांमध्ये घट दिसून आली. अद्यापही टाळेबंदी उठलेली नाही. टाळेबंदीतील शिथिलता लोकांनी गांभीर्याने घ्यायला हवी. अन्यथा आपण कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.