नवी मुंबईच्या घाऊक बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने सत्तरी गाठली असल्याचे चित्र आहे. या दोन जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झालेली असताना बटाटय़ाचे भाव भडकले आहेत.  दिवाळीनंतर सुरू झालेली ही दरवाढ आणखी काही दिवस राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कमी पुरवठय़ामुळे विविध बाजारपेठेत कांद्याने साठी गाठल्याने किरकोळ बाजारात हा दर ८० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे. गेल्या दोन दिवसापासून टोमॅटो महागले आहेत. तुर्भे येथील घाऊक बाजारपेठेत आवक घटल्याने ही दरवाढ झाली असल्याची माहिती भाजी बाजार संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हयातून राज्याला टोमॅटो पुरवठा करणाऱ्या या जिल्हयाने यावर्षी शेजारधर्म पाळताना कर्नाटक आणि गुजरात राज्यांना टोमॅटो पुरवठा केला आहे. नेहमी कमी पुरवठय़ाचा फायदा उचलणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी लागलीच ७० ते ८० रुपये दराने टॉमेटो विकून आपले उखळ पांढरे करून घेतले. येत्या पंधरा दिवसात कर्नाटक मधून वाटाणे व राजस्थानमधून गाजर या भाज्यांची आवक वाढल्यानंतर टोमॅटोची ही दरवाढ नजरेआड केली जाईल, असे मत पिंगळे यांनी व्यक्त केले. हुबळी येथील कांद्याचा उठाव घसरल्याने येथील कांदा मुंबईकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कांदा येत्या दोन दिवसात दोन तीन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.  आहेत. बटाटा आज अचानक घाऊक बाजारात १० रुपयांनी महाग झाला . त्यामुळे किरकोळ बाजारात तो ३५ रुपयापर्यंत विकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील बटाटय़ावर सध्या मुंबईची मदार आहे. मात्र तेथील आवकही घटली आहे. त्यामुळे बटाटाही १० ते १५ रुपयांनी महागला आहे. उत्तर प्रदेशातील बटाटा संपतानाच पंजाब मधील बटाटय़ाची आवक सुरु होत असते. ही साखळी तुटल्याने ही भाववाड झाल्याचे कांद्या बटाटा व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
कोबी-फ्लॉवरचा पर्याय
टोमॅटो महागल्याने आता कोबी फ्लॉवर हा उत्तम पर्याय निर्माण झाला आहे. नारायणगाव, सांगली, सोलापूर मधून फ्लॉवरची आवक वाढली असल्याने ही भाजी १४ ते १६ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. कर्नाटकमधून मोठय़ा प्रमाणात कोबी येऊ लागल्याने ही भाजीही १६ ते १७ रुपये प्रति किलोने घाऊक बाजारात उपलब्ध आहे.