पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथून कोकणात जाणारी एक तरी गाडी सुरू करावी, ही प्रवासी संघटनांची मागणी पश्चिम रेल्वेने काही अंशी पूर्ण केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांनी केलेली मागणी नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने पूर्ण झाली असल्याची भावना प्रवाशांच्या मनात आहे. तरीही आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवात तरी पश्चिम रेल्वेवरून कोकण गाठणे शक्य होईल, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत. त्यामुळे आता ‘वांद्रे टू गोवा’ प्रवास सुरू होणार आहे.
मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवरूनही गोव्यासाठी किंवा कोकणासाठी गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी वारंवार केली जात होती. मात्र वसई रोड आणि नायगाव या दोन स्थानकांदरम्यान तीन किलोमीटरचा एक भूभाग रेल्वेला रूळ टाकण्यासाठी हवा होता. त्यामुळे या मागणीला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र नाताळ आणि ३१ डिसेंबर यासाठी गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करून पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसहून मडगावला जाणारी प्रीमियम गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ डिसेंबर या दरम्यान ही गाडी आठ फेऱ्या मारणार आहे. वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या पहिल्या दोन गाडय़ांचे आरक्षण १२ डिसेंबरपासून सुरू होईल. तसेच इतर गाडय़ांचे आरक्षण प्रवासाच्या १५ दिवस आधीपासून उपलब्ध असेल, असे पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे.
वांद्रे  टर्मिनस
*गाडी क्रमांक ०९००९ डाऊन
*कुठून कुठे? वांद्रे ते मडगाव
*कधी? २१, २३, २८, ३० डिसें.  
*वेळ? रात्री ११.४० वाजता
*पोहोचेल कधी?
   दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ .
*थांबे कोणते?
   बोरिवली, वसई रोड, पनवेल,
   रत्नागिरी आणि सावंतवाडी

मनमाड

*गाडी क्रमांक ०९०१० डाऊन
*कुठून कुठे? मडगाव ते वांद्रे
*कधी? २२, २४, २९, ३१ डिसें.  
*वेळ? दुपारी ३.३० वाजता
*पोहोचेल कधी?
   दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१०.
*थांबे कोणते?
   सावंतवाडी, रत्नागिरी, पनवेल,
   वसई रोड, बोरिवली

*गाडीचे आरक्षण फक्त आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरच.
*गाडीच्या तिकिटाचे दर उपलब्धतेनुसार कमी-जास्त होणार.
*गाडीसाठी प्रतीक्षा यादी नसेल.
*तिकीट रद्द केल्यास परतावा नाही.