काळीपिवळीही आता ‘स्मार्ट’ होणार

शेअर टॅक्सी असो किंवा स्वतंत्र टॅक्सी असो, रोज उतरल्यावर सुटय़ा पैशांसाठीचा वाद हा ठरलेलाच. पण आता हा वाद टाळणे शक्य आहे. तसेच खिशात पैसे नसतानाही टॅक्सी प्रवास करणेही शक्य होणार आहे. कारण आता मुंबईचे टॅक्सीचालक ‘फ्रीचार्ज’ या ‘पेमेंट गेट वे’च्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे घेणार आहेत.

ओला, उबेर या कंपन्यांच्या स्मार्ट टॅक्सी सेवांचा लाभ घेण्याकडे प्रवाशांचा कल वाढत असल्यामुळे काळी-पिवळी टॅक्सीचालकांनीही स्मार्ट होण्याचा पर्याय स्वीकारला आहे. यामुळे मोबाइल, डीटीएच रीचार्जपासून ते वीजदेयक भरणा, लँडलाइन देयक भरणा मुंबई मेट्रो, गॅस नोंदणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या फ्रीचार्ज या पेमेंट गेट वेच्या माध्यमातून टॅक्सीचालक ग्राहकांकडून पैसे घेणार आहेत. यामुळे टॅक्सीचालक आणि ग्राहक या दोघांचा फायदा होत आहे. टॅक्सीचालकांसमोरील सुटय़ांची अडचण संपली तर ग्राहकांना अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे भरल्यामुळे काही रिवॉर्डस्ही मिळत आहेत.

सेवा घेताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडवणे हा आमच्या व्यवसायाचा मुख्य उद्देश असल्यामुळे आम्ही टॅक्सी आणि रिक्षा ग्राहकांना पैसे देणे सोपे व्हावे या उद्देशाने ही सुविधा सुरू केल्याचे फ्रीचार्जचे मुख्य व्यवसाय अधिकारी सुदीप टंडन यांनी सांगितले. सध्या दिल्ली आणि मुंबई मिळून दहा हजार टॅक्सीचालकांनी नोंदणी केली असून मुंबईत सहा हजार टॅक्सींची फ्रीचार्जवर नोंदणी असल्याचे टंडन यांनी नमूद केले. भविष्यात ही सुविधा रिक्षा, रेल्वे, बससेवा, खाद्यपदार्थाच्या दुकानातील खरेदी आदी सेवांच्या पैसे भरणा या अ‍ॅपच्या माध्यमातून करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे टंडन यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून फ्री चार्ज अ‍ॅपचा वापर करणारे टॅक्सीचालक पंकज पांडे सांगतात की या अ‍ॅपमुळे ग्राहकांशी होणारे सुटय़ा पैशांसाठीचे वाद कमी झाले. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे भरणेही सोपे होत असल्याचे ते म्हणाले.

  • अ‍ॅपवर ‘र्मचट’ म्हणून नोंदणी केल्यावर टॅक्सीचालकास ‘आम्ही फ्रीचार्जचा वापर करतो’ असे सांगणारा फलक  टॅक्सीवर झळकवायचा आहे.
  • या अ‍ॅपच्या माध्यमातून टॅक्सीचालकाकडे जेवढे पैसे जमा होतील ते त्यांच्या अ‍ॅप वॉलेटमध्ये जमा राहतील.
  • या जमा पैशांमधून टॅक्सीचालक त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या फोनचे रीचार्ज करणे, विविध देयकांचा भरणा करू शकतात.
  • जर हे पैसे त्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे असतील तर तेही करता येईल.