बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी आसामच्या धर्तीवर मुंबईतही राष्ट्रीय नागरिक नोंदणी विभागाने (एनआरसी) नागरिकांची नोंदणी करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे.

सध्या आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीवरुन वाद निर्माण झाला आहे. आसाममधील नागरिकांच्या नोंदणीचा अंतिम मसुदा नुकताच जाहीर झाला आहे. यात एकूण ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी २ कोटी ८९ लाख लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर जवळपास ४० लाख ७ हजार नागरिकांचे अर्ज फेटाळले गेले असून ते आता अवैध नागरिक ठरले आहेत.

आसाममधील एनआरसीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपा आमदार राज पुरोहित यांनी मुंबईतही एनआरसी लागू करुन नागरिकांची अधिकृत यादी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात राज पुरोहित यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र देखील पाठवले आहे. ‘नागरिकांची नोंदणी केल्यास कुलाबा आणि मुंबईच्या अन्य भागांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेता येईल’, असे त्यांनी सांगितले.