विजेची वाढती मागणी भागवायची असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. म्हणूनच तिची निर्मिती आणि हाताळणी ही अधिक गांभीर्याने घ्यायला हवी. त्यासाठी देशांनी एकत्र येऊन जागातिक स्तरावर संशोधन करण्याची गरज आहे, असे मत अणुऊर्जेवर आयोजिण्यात आलेल्या परिसंवाद व्यक्त करण्यात आले.
भारतातच नव्हे तर देशामध्येच विजेचा तुटवडा भासतो आहे. सध्याचे विजेचे स्रोत हे पुरेसे नसल्याने अणुऊर्जा आणि अपारंपरिक अशा नव्या स्रोतांचा विचार ऊर्जानिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. यापैकी अणुऊर्जेबाबत लोकांच्या शंका असतील तर त्यांना आपण हे समजावून दिले पाहिजे. याचबरोबर अणुऊर्जेचा सुरक्षितपणे वापर करता यावा यासाठी तिची हाताळणी आणि व्यवस्थापन अधिक गांभीर्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी देशांनीच एकत्र येऊन अणुऊर्जेचे संशोधन आणि विकास यावर काम केले पाहिजे. यात उद्योजकांनीही आपल्या ज्ञानाने व माहितीने हातभार लावावा, असे आवाहन फ्रान्सच्या ‘अल्टरनेटीव्ह एनर्जीज अ‍ॅण्ड अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशन’चे अध्यक्ष बर्नार्ड बिगॉट यांनी केले.
ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले. आपण चुकीच्या लोकांना विजेवर सबसिडी देतो. आपण आधी विजेचे दर वाढवायला हवेत. वेगवेगळ्या लोकांकरिता विजेचे दर हे वेगळे असायला हवे. गरिबांकरिता ते स्वस्त तर श्रीमंतांकरिता ते दर महाग असायला हवे, अशी मागणी आयआयटीचे एस. पी.  सुखात्मे यांनी केली. तर यात बीएआरसीच्या शेखर बासू यांनी आरोग्य, कर्करोग उपचार, रेडिओ फार्मास्युटिकल वापरून तयार करण्यात येणारी औषधे, शेती आदी गोष्टींकरिता अणुऊर्जेचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.