एकीकडे भायखळा, वरळी, धारावीमधील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असला तरीही मुंबईमध्ये शुक्रवारी एक हजार ३७२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ५५ हजारांच्या वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ९० करोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत शुक्रवारी एक हजार ३७२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ हजार ३५७ वर पोहोचली आहे. दिवसभरात ९० जणांना करोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले असून त्यात ६५ पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यात ६८८ नवे बाधित

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी दिवसभरात ६८८ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या १४ हजार ४०३ झाली आहे. शुक्रवारी ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील बळींची संख्या ४७४ झाली आहे. जिल्ह्य़ात शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १७४, नवी मुंबईतील १२९, कल्याण-डोंबिवलीतील १८५, भिवंडी शहरातील ३७, अंबरनाथ शहरातील २८, उल्हासनगर शहरातील ३८ रुग्णांचा समावेश आहे.

मालाडमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक

मुंबई : मार्चमध्ये करोनाच्या संसर्गाने धुमाकूळ घातलेल्या भायखळा, वरळी, माटुंगा-वडाळा, धारावी, वांद्रे पूर्व परिसरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० ते ४० दिवसांदरम्यान पोहोचला आहे. मात्र त्याच वेळी मालाड आणि दहिसर परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. परिणामी, येथील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये टाळेबंदी आणि संचारबंदी काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालाड म्हणजेच पी-उत्तर विभागातील रुग्णसंख्या २३५३ वर तर दहिसर म्हणजेच आर-उत्तर विभागातील रुग्णसंख्या ७१५ झाली आहे. या दोन्ही विभागांमधील रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा काळ अनुक्रमे १२ आणि १३ दिवस झाला आहे.