मंगळवारी मुंबईत नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. १७१३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर २३१९ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले. मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या ८२ टक्के झाली आहे. तर दुसरीकडे ४९ रुग्णांचा मृत्यू झाला.

सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच वाढू लागलेला करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. रुग्णवाढीचा दरही कमी होऊ लागला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून ६६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत करोना चाचण्यांनी ११ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर एका दिवसात रुग्णांच्या संपर्कातील १३,४५५ लोकांचा पालिकेने शोध घेतला आहे.

मुंबईत आतापर्यंत २,०२,४८८ लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १,६७,२०२ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या २६,००१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १७ हजारांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर सुमारे ७ हजार रुग्णांना लक्षणे आहेत. सुमारे १४०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.