राज्यात करोनाच्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची सख्या जवळपास दुपटीने वाढली आहे.

राज्यात सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी १ लाख ४७ हजार रुग्ण उपचाराधीन असल्याची, तसेच २ लाख ८७ हजार रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. मुंबईतील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसत आहे.

राज्यात सोमवापर्यंत करोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने होकारात्मक आले आहेत. हे प्रमाण  १९.५८ टक्के इतके  आहे. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ६३.७६ टक्के  झाला आहे.  राज्यात सध्या ९ लाख ४० हजार ४८६ जण गृहविलगीकरणात, तर ३७ हजार ९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुंबईत एकू ण बाधितांचा आकडा मोठा वाटत असला, तरी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. महिन्याभरात  उपचाराधीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.

महिनाभरापूर्वी, ३ जुलै रोजी मुंबईत बाधित रुग्णांची संख्या ८२ हजार ७४ होती. त्यापैकी ५२ हजार ३९२ रुग्ण बरे झाले आणि २४ हजार ९१२ रुग्ण उपचाराधीन होते. पंधरा दिवसांनंतर, उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजार ७२८ आणि ३ ऑगस्टची उपचाराधीन रुग्णांची संख्या २० हजार ५२८ इतकी असल्याची नोंद आहे.

ठाणे, पुण्याची स्थिती बिकट

मुंबईची परिस्थिती सुधारत असताना ठाणे पुणे जिल्ह्य़ातील करोना स्थिती बिकट होत चालल्याचे चित्र आहे. सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्य़ात बाधित रुग्ण ९७ हजार ३४३, बरे झालेले रुग्ण ६२ हजार ४४८ आणि उपचाराधीन रुग्ण ३१ हजार १९१ आहेत.

मुंबईपेक्षा पुणे जिल्ह्य़ातील उपचाराधीन रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. या जिल्ह्य़ात बाधित रुग्णांची संख्या ९६ हजार ६६९ इतकी आहे. त्यापैकी  ५२ हजार ७१९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ४१ हजार ६६४ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.