सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमधील करोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी शतक ओलांडले. शुक्रवारी दिवसभरात १५ नवे बाधित सापडले, तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील बाधितांची संख्या १०१ वर, तर मृतांची संख्या १० वर पोहोचली. या परिसरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आसपासच्या भागात करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात के ली होती. आता करोनाचा संसर्ग माटुंगा लेबर कॅम्पमध्येही पोहोचला आहे. माटुंगा लेबर कॅम्पमधील चौघांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, या भागातील नागरिकांच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. धारावीमधील डॉ. बालिगा नगर, वैभव अपार्टस्मेन्ट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवडा चाळ, मुस्लीम नगर, सोशल नगर, जनता सोसायटी, कल्याणवाडी, पीएमजीपी कॉलनी, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ, शास्त्री नगर, नेहरू चाळ, इंदिरा चाळ, गुलमोहर चाळ, साईराज नगर, ट्रान्झिट कॅम्प, रामजी चाळ, सूर्योदय सोसायटी, लक्ष्मी चाळ, शिव शक्ती नगर, माटुंगा लेबर कॅम्प येथे करोनाबाधित आढळून आले आहेत.  रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे यंत्रणांचे धाबे दणाणले असून करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मुंबईत ७७ नवे रुग्ण

मुंबईमधील विविध रुग्णालयांमध्ये शुक्रवारी २०१ करोना संशयितांना दाखल करण्यात आले असून दिवसभरात ७७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या तब्बल २१२० वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून करोना बळींची संख्या १२१ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी ३७ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दरम्यान, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ४६ हजारांहून अधिक व्यक्तींना घरातच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

रायगड : ३८ जणांना संसर्ग

‘करोना विषाणू’चे संक्रमण झालेल्यांची संख्या दोन दिवस ३१ वर स्थिरावली असताना शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्य़ात सातजणांना लागण झाली. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ वर पोचली आहे. यातील एक रुग्ण श्रीवर्धन तालुक्यातील आहे. उर्वरित पाच रुग्ण पनवेल पालिका क्षेत्रातील आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात याआधी २६ रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी पालिका हद्दीत पाच रुग्ण आढळले.