मुंबईत गुरुवारी एक हजार ४४२ जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ४४ हजार ७०४ वर पोहोचली आहे. गुरुवारी ४८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या एक हजार ४६५ झाली आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस पडू लागला. एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे करोनाचा संसर्ग असे दुहेरी संकट मुंबईसमोर आहे. म्हणून ताप आल्यास दुर्लक्ष करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईत गुरुवारी ४८ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३३ जणांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील ८४५ संशयितांना गुरुवारी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून आतापर्यंत रुग्णालयात दाखल केलेल्या संशयित रुग्णांची संख्या ३४ हजार ६५ झाली आहे. गुरुवारी ६२६ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयामधून घरी पाठविण्यात आले. करोनाबाधितांची एकूण संख्या ४४ हजार ७०४ झाली असली तरी त्यापैकी तब्बल १८ हजार ९८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.

करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीची चिठ्ठीविना थेट चाचणी

करोनाबाधितांच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांना आता चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता नाही, तर त्यांच्या थेट चाचण्या केल्या जातील, असा निर्णय पालिकेने घेतला आहे.

घरातच अलगीकरणात राहणाऱ्या व्यक्तींना चाचण्यांसाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य होती. मात्र या व्यक्ती घरातच असल्याने आणि बऱ्याचदा लक्षणे नसल्याने चिठ्ठी मिळविण्यात अडचणी येत होत्या. परंतु या व्यक्तींना आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचण्या करता येतील. अशा व्यक्तींकडून  रुग्णाच्या थेट संपर्कात आल्याचे पत्र लिहून घ्यावे आणि त्यांच्या चाचण्या कराव्यात अशा सूचना पालिकेने विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

घरी जाऊन नमुने घेण्यास पालिकेने खासगी चाचणी संस्थांना मनाई केली आहे. हालचाल करू न शकणारे वृद्ध किंवा अंथरूणावर असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या घरी करता येतील. खासगी पद्धतीने चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळेच्या केंद्रावर जाऊन चाचण्या करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

कोणत्याही डॉक्टरांची चिठ्ठी

काही खासगी प्रयोगशाळा अजूनही पालिकेच्या डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय चाचण्या करण्यास नकार देत आहेत. खासगी डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी करून दिलेली चिठ्ठी ग्राह्य़ धरली जाणार असून त्यानुसार चाचण्या करण्याची परवानगी खासगी प्रयोगशाळांना दिली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.