औषधोपचाराने बरा होणारा, ही ओळख असली तरी क्षयरोगाच्या विळख्याने मुंबईपाठोपाठ रायगड जिल्ह्य़ालाही घेरल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात  क्षयरुग्णांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असून गेल्या दीड वर्षांत निव्वळ क्षयरोगामुळे ३८२ जणांचा मृत्यू झाला, तर २ हजार ७९५ जणांना क्षयरोगाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 वाढते शहरीकरण, लोकसंख्येची घनता आणि गर्दीची ठिकाणे ही क्षयरोगाचा प्रसार व्यापक प्रमाणात होण्यास कारणीभूत ठरत आहेत. विशेष म्हणजे मुंबईला सर्वात जवळ असलेल्या पनवेल, उरण आणि कर्जत यांसारख्या तालुक्यांमध्येच क्षयरुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
जिल्ह्य़ात क्षयरोगाचे प्रमाण वाढत असतानाच त्यावर उपचार करून घेणाऱ्यांचे प्रमाण घटत चालले आहे.   जिल्ह्य़ातील कर्जत, पनवेल, उरण, खोपोली, पेण आणि अलिबाग या परिसरात शहरीकरणाने वेग घेतला आहे. लोकसंख्येची घनता वाढल्याने क्षयरोगाचा प्रसार होण्यास पोषक वातावरण तयार होते. अभ्यासकांनुसार क्षयरोग झालेला एक रुग्ण वर्षभरात १५ जणांना क्षयरोगाची बाधा करू शकतो. त्यामुळे या रोगाबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे.
75
क्षयरोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्य़ात ४५ सूक्ष्मदर्शी केंद्र, ११ क्षयरोग पथक, ४९ क्षेत्रीय कर्मचारी, ८० परिसर आरोग्य संस्था, १ हजार डॉट्स केंद्र सुरू करण्यात आली आहे. क्षयरोगाची कारणे, दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धती, अर्धवट उपचार सोडल्याने होणारे परिणाम याबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे.
डॉ. दिगंबर शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, रायगड

मुंबईतील क्षयस्थिती
डेंग्यूचे नवे भय कायम असताना मुंबईत दर महिन्याला दीडशे ते २०० जणांचा मृत्यू क्षयरोगामुळे होतो हे सत्य आहे. वर्षांकाठी क्षयामुळे जवळपास दोन हजार मुंबईकर प्राणाला मुकतात. इतकेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांत खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या सुमारे दहा हजार असल्याचे लक्षात आले. मात्र तरीही खासगी डॉक्टरांकडील क्षयरोग्यांची खरी संख्या पडद्याआडच असल्याचे पालिकेचे मत आहे. अनेक कारणांमुळे टीबी रुग्णांची नोंद पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याने खरा आकडा शोधणे पालिकेसाठी एक आव्हानच आहे. २००७ ते २०१३ या कालावधीत वर्षांला ३० हजार रुग्ण क्षयाने बाधित झाले होते, तर दोन हजार मृत्युमुखी पडले होते.