मुंबईतील बधितांची संख्या १२ हजाराच्या पुढे गेली आहे. मुंबईत शनिवारी ७२२ नवीन रुग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ४८९ पर्यंत पोहोचली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ७०० च्या वर रुग्ण सापडत आहेत, तर संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे. शनिवारी ७२२ रुग्ण वाढल्यामुळे बाधितांची संख्या १२,६८९ वर गेली आहे, तर आणखी ६५२ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी २७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १६ महिला तर ११ पुरुष आहेत, तर १५ रुग्ण ६० वर्षांखालील आहेत.

धारावी : रुग्णसंख्या ८३३ वर

धारावीत आणखी २५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ८३३ वर गेली आहे. २७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. माहिममध्ये पाच रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा ११२ वर गेला आहे. दादरमध्ये १८ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील ८ रुग्ण हे कासारवाडी येथील आहेत. त्यामुळे दादरमधील रुग्णांचा आकडा १०५ झाला आहे. शनिवारी २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २७९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. वरळीच्या एनएससीआय येथील करोना काळजी केंद्रातून शनिवारी १३७ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. यात वरळी, प्रभादेवीतील ९५ रुग्ण असून अन्य रुग्ण हे मुंबईच्या विविध भागांतील आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये ८४ वर्षीय महिलेपासून ते दहा वर्षीय बालकांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे.

पालिकेतील पाचवा बळी

पालिकेच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कार्यशाळा विद्युत विभागातील हा कर्मचारी आय हॉस्पिटलमध्ये तत्काळ सेवेत कार्यरत होता. तेथे त्याला करोनाची लागण झाली होती. शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बेस्ट उपक्रमातील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ७० झाली आहे. शनिवारी आणखी ६ रुग्ण आढळले असून त्यात माहिम आगारातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे, तर अजून ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

करोनाबाधित रुग्णाची आत्महत्या

सेव्हन हिल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६० वर्षीय करोनाबाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी घडला. शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास सेव्हन हिल रुग्णालयातील इमारतीच्या नवव्या मजल्यावरील लोखंडी सळईला पायजमा गुंडाळून या रुग्णाने गळफास घेतला. ही बाधित व्यक्ती विक्रोळीतील हरीयाला व्हिलेज परिसरात कुटुंबासह राहत होती. त्यांना करोनाची बाधा झाल्यानंतर उपचारांसाठी अंधेरी मरोळ परिसरातील सेव्हन हिल रुग्णालयात  दाखल केले होते.

करोनाग्रस्त कैद्यांना माहूलमध्ये ठेवण्यास विरोध

आर्थर रोड कारागृहातील करोनाबाधित कैद्यांना माहूलमध्ये ठेवण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. आर्थर रोड कारागृहातील ७२ कैद्यांना माहूल येथील इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्यावर विचार सुरू आहे. मात्र स्थानिकांचा त्याला विरोध आहे. प्रदूषित माहूलमध्ये या कैद्यांना आणल्यास स्थानिकांमध्ये करोनाचा प्रसार होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. तसेच माहूलमधील वातावरणात प्रदूषित घटकांचे प्रमाण अधिक आहे. त्याचाही या करोनाबाधितांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांचा आजार बळावण्याची शक्यता रहिवासी व्यक्त करत आहेत. दरम्यान करोनाबाधित रुग्णांना माहूलमध्ये आणू नये, या मागणीसाठी शेकडो रहिवासी शनिवारी रस्त्यावर उतरले होते.