वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील महापालिका प्रभागांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेने धास्तावलेल्या लोकप्रतिनिधींनी आसपासच्या विभागातही समाजसेवेला वाहून घेतले होते. पण नियमानुसार प्रभागांची संख्या २२७ पेक्षा वाढविता येणार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे लोकप्रतिनिधींचा जीव भांडय़ात पडला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबईमध्ये मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही मोहीम ८ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबपर्यंत राबविण्यात येणार आहे. जनजागृतीच्या कामासाठी पालिकेतील २,१५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना आपले नाव या मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मतदार यादीमध्ये नाव नसलेल्यांनाही नाव नोंदणीची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना निवासाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळून वास्तव्य असलेल्या ठिकाणी नोंदविणे आदी सुविधाही या काळात उपलब्ध करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. मतदार नोंदणी अथवा तत्संबंधीच्या तक्रारींसाठी नागरिकांनी १९५० या क्रमांकावर अथवा ूी.ेंँं१ं२ँ३१ं.ॠ५.्रल्ल वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.सध्या मुंबईत २२७ प्रभाग आहेत. त्यामध्ये वाढ करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. तूर्तास हे शक्य नसल्याने पालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभागांची संख्या २२७ असेल, असे उपायुक्त मिलिन सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. प्रभागांची संख्या वाढल्यामुळे नव्या समस्येला तोंड द्यावे लागेल अशी भीती लोकप्रतिनिधींना वाटत होती. मात्र आता प्रभाग संख्येत वाढ होत नसल्याचे निश्चित झाल्यामुळे लोकप्रतिनिधींचा जीव भांडय़ात पडला आहे.