संदीप आचार्य 
उद्या आम्हाला करोना झाला तर घरच्या लहान मुलांची काळजी कोण घेणार ? आम्हाला करोनासाठी संरक्षित ड्रेस मिळणार की नाही ? असा संतप्त सवाल करत जोगेश्वरी येथील महापालिकेच्या ‘बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल’मधील परिचारिकांनी जोरदार घोषणा देत हॉस्पिटल दणाणून सोडले. परिचारिका घोषणा देत असताना पालिका मुख्यालयात आढावा घेणाऱ्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह यंत्रणेला आंदोलनाचा पत्ताही नव्हता. फोनवरून लोकसत्ताच्या पत्रकाराने माहिती दिली तेव्हा पालिका यंत्रणा जागी झाली.

मुंबईसह राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठिकाणी डॉक्टर व परिचारिकांवरच क्वारंटाईन होण्याची वेळ येत आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सामान्य विभागात दाखल झालेल्या रुग्णाने करोनाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरांसह १४ लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करावे लागले. पण बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलची परिस्थिती वेगळी आहे. येथे सातव्या व आठव्या मजल्यावर करोनाबाधितांसाठी १०० विलगीकरण खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

१३ मजली रुग्णालयात करोनाबाधितांसाठी आणखी १०० खाटांची तयारी केली जात असून सध्या करोनाबाधित रुग्णांची व्यवस्था पाहण्यासाठी ८० परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या येथे करोनाची चाचणी पॉझिटिव्ह असलेले ३० रुग्ण तर विलगीकरणाखाली ७४ रुग्ण दाखल आहेत. याशिवाय ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे असेही रुग्ण असून यातील नऊ रुग्ण दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आल्याचे येथील परिचारिकांचे म्हणणे आहे.

आज आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करतो याची बाहेर कोणाला कल्पना नाही. ८० परिचारिका असताना आम्हाला केवळ पाच करोनासंरक्षित ड्रेस पाठविण्यात आले. आम्ही काम कसे करायचे ? असा संतप्त सवाल या परिचारिकांनी केला. आमच्या घरीही लहान मुलं आहेत. आम्ही करोना रुग्णांवर उपचार करायला तयार आहोत. काम करण्यासाठी आम्ही कायम सज्ज आहोत, पण आमच्यासाठी किमान करोना सूट तसेच आवश्यक ते मास्क वगैरे पुरेसे साहित्य तरी पालिकेने दिले पाहिजे. उद्या आम्हाला करोना झाल्यावर आमची काळजी कोण घेणार? असा सवालही या परिचारिकांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

दिवसरात्र काम करणाऱ्या या परिचारिकांच्या जेवणाखाण्याचीही योग्य काळजी पालिका प्रशासनाकडून घेतली जात नाही. आज या ८० परिचारिकांना पालिकेने वेळेत जेवण न पाठवल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहाण्याची वेळ आली. पालिकेने दुपारी उशिरा जेवण पाठवले व तेही आंबलेले जेवण होते, असे येथील परिचारिकांनी सांगितले. या परिचारिकांनी स्वत: न जेवता रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून ९० रुग्णांसाठी जेवण करून रुग्णांना दिले आणि स्वत: मात्र उपाशी राहिल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

एकीकडे परिचारिकांना सुरक्षिततेसाठी पुरेसे ड्रेस नाहीत तर दुसरीकडे करोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी नऊ रुग्णांना करोना असल्याचे आढळून येते. अशा परिस्थितीत आम्ही आमचा जीव कोणाच्या भरवशावर धोक्यात घालायचा असा अस्वस्थ करणारा सवाल या परिचारिकांचा आहे. आम्ही ‘नाइटिंगेल’ बनायला तयार आहोत पण आम्हाला आवश्यक त्या किमान सुविधा तरी द्या, अशी त्यांची मागणी आहे. घरी मुलं बाळं सोडून आम्ही रुग्णसेवा करतो याची तरी जाण प्रशासनाने बाळगावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे.

महापालिकेकडून दखल
“बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील परिचारिकांना उद्याच्या उद्या पुरेसे करोना संरक्षित ड्रेस पाठवले जातील. त्यांना वेळेवरच जेवण नाश्ता मिळाला पाहिजे व मी स्वतः त्याची खात्री करून घेईन. आमचे डॉक्टर, परिचारिका व करोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाची योग्य काळजी घेतली जाईल. आज जेवण का उशीरा गेले याचीही चौकशी केली जाईल व पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची मी हमी देतो,” असं आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी झालेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर दिली आहे.