डॉ. अजय महाजन, हृदयरोगतज्ज्ञ, लोकमान्य टिळक पालिका (सायन) रुग्णालय

जगभरात २९ सप्टेंबर हा हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने २००९ ते २०१२ मध्ये पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाच्या वतीने ४० वयोगटांच्या आतील ४०० हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यात पुरुषांमध्ये धुम्रपान आणि स्त्रियांमध्ये स्थूलतेमुळे हृदयांसंबधितचे प्रश्न निर्माण झाल्याचे वास्तव पुढे आले. तर, हृदयविकाराचा झटका आला असतानाही १४ ते १५ टक्के रुग्णांना अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास असेल असा गैरसमज झाला असल्याचेही अहवालावरून निदर्शनास आले आहे. एकंदर बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि व्यसन यामुळे हृदयासंबंधितचे आजार वाढत असल्याचे पाहणीवरून पुढे आले आहे. या अहवालासाठी मार्गदर्शन करणारे सायन रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागातील डॉ. अजय महाजन यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

  • हृदयविकाराचा सर्वाधिक धोका कोणाला असल्याचे आढळून आले?

हृदयविकाराचा झटका येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. सध्या बदलत्या जीवनशैली आणि अपुऱ्या आहारामुळे तरुणांना वेगवेगळ्या आजारांचा विळखा पडत आहे. मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार हे आजार वयाच्या साठीनंतर होत होते. त्या आजारांची लागण वयाच्या पस्तीशीनंतर होत आहे. ही चिंतेची बाब असून यावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आम्ही केलेल्या पाहणीनुसार धूम्रपान आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे वास्तव पुढे आले. धूम्रपान किंवा कुठलाही गुटखा खाण्याच्या प्रकारामुळे व्यक्तीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. आम्ही हृदयविकार असणाऱ्या ४०० रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. हे ४०० रुग्ण चाळिशीच्या आतील आहेत. तरुणांमध्ये हृदयविकाराची वाढती संख्या पाहता धूम्रपान करणाऱ्या ३४ टक्के तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. यामध्ये एका धमनीत अडथळा आलेल्या रुग्णांचे प्रमाण ४३ टक्के तर तीनही धमन्यांमध्ये अडथळा असलेल्या रुग्णांचे प्रमाण ५.५ टक्के इतके होते. ६ टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिकता हे कारण आढळून आले.

  • महिलांमध्ये हृदयविकार होण्याची कारणे काय?

आम्ही सर्वेक्षण केलेल्या ७ टक्के महिलांना स्थूलता या कारणामुळे हृदयविकार जडला असल्याचे निदर्शनास आले. बदलती जीवनशैली, फास्ट फूडचे सेवन, मानसिक तणाव हीदेखील हृदयविकार होण्याची अनेक कारणे आहे. त्यापैकी महिलांमध्ये मुख्यत: स्थूलतेची कारणे दिसून आली आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यात स्थूलतेमुळे चरबी जमा होते, यामुळे रक्तप्रवाहाला अडथळे निर्माण होतात. यामुळे हृदयाला सुरळीत रक्तपुरवठा होत नाही आणि यातून हृदयविकाराचा झटका संभवतो.

  • हृदयविकाराचा झटका आणि आम्लपित्ताच्या वेदना यातील फरक नेमका कसा ओळखावा?

-हृदयविकाराचा झटका हा कायम छातीच्या मध्यभागापासून डाव्या बाजूच्या अवयवांवर परिणाम करतो. यात घाम येणे, भीती वाटणे असे प्रकार घडतात. पाच मिनिटांहून अधिक काळ या वेदना सुरू राहिल्या तर रुग्णांनी तातडीने पालिकेच्या रुग्णालयांशी संपर्क साधावा. आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार ३० टक्के रुग्ण बारा तासांनंतर उपचारांसाठी आले तर १४ ते १५ टक्के लोकांनी आम्लपित्ताचा त्रास समजून दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णांनी हृदयातून कळा आल्यावर तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावेत. पाच मिनिटांपेक्षा हृदयातून कळा येत असतील तर डॉक्टरांना दाखवून हृदयाचा आलेख (ईसीजी) काढून घ्यावा. आम्लपित्ताच्या त्रासात हृदयातून येणाऱ्या वेदना काही काळ थांबून येत असतात. या वेदना बऱ्याचदा शरीराच्या मध्यभागापासून सुरू होत नाही. तर डाव्या बाजूला छातीच्या दिशेने या वेदना सुरू असतात. यात घाबरल्यासारखे होत नाही तर ढेकर आल्यानंतर छातीतील कळा येणे बंद होते.

  • हृदयविकाराच्या उपचारावर कुठल्या पद्धती उपलब्ध आहे?

-हृदयविकाराच्या उपचारासाठी थ्रम्बोलायटिक थेरेपी उपलब्ध असून याच्या साहाय्याने रक्तातील गुठळ्या विरघळवल्या जातात. ही थेरेपी पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत आहे. त्याशिवाय हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथम ईसीजी काढून घ्यावे आणि निदान झाल्यावर तज्ज्ञांकडून एंजिओग्राफी किंवा एंजियोप्लास्टी करण्याचे ठरविले जाते.

  • हृदयविकारावर तातडीने उपचार व्हावे यासाठी काय काळजी घ्यावी?

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १२ तासांच्या आत उपचार सुरू होणे आवश्यक आहे. कमी किमतीत उपचार करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनांचा फायदा होऊ शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्यासोबत रेशनकार्ड, आधार कार्डची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. आपल्याकडे नियमानुसार रुग्णाला उपचारासाठी नोंदणी करणे आवश्यक असते. अनेकदा रुग्णांकडे ओळखपत्र आदी कागदपत्रे नसल्यामुळे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. पालिकेकडे उपचार घेतले जात असताना काही कागदपत्रे जवळ बाळगावी.

  • हृदयविकार टाळण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे?

सध्याची जीवनशैली बदलली असून पोषक आहार आणि पुरेसा व्यायाम याच्या अभावामुळे हृदयाचे आरोग्य बिघडत चालले आहे. स्पर्धेच्या युगात सर्वाना आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे अशा वेळी आहाराची आणि आरोग्याची पर्वा न करता कामामध्ये झोकून दिले जाते. मात्र या कारणांमुळे हृदयाबाबतचे अनेक प्रश्न निर्माण होतात. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. त्याबरोबरच पुरेशी झोप, पोषक आहार आवश्यक आहे. अति ताणतणावामुळेही हृदयाच्या आरोग्याला धोका संभवू शकतो. या वेळी योग यांसारख्या प्रकारांचा अवलंब करावा. तर स्थूलता वाढणाऱ्या पदार्थाचे सेवन टाळावे. पिझ्झा, बर्गर यामध्ये मेदाचे प्रमाण अधिक असतो, तर कोल्ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे आणि आहारात पौष्टिक पदार्थाचा समावेश करावा.

त्रध्याची जीवनशैली बदलली असून पोषक आहार आणि पुरेसा व्यायाम याच्या अभावामुळे हृदयाचे आरोग्य बिघडत चालले आहे. स्पर्धेच्या युगात सर्वाना आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे अशा वेळी आहाराची आणि आरोग्याची पर्वा करता कामामध्ये झोकून दिले जाते. मात्र या कारणांमुळे हृदयाबाबतचे अनेक प्रश्न निर्माण होतात. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. त्याबरोबरच पुरेशी झोप, पोषक आहार आवश्यक आहे. अति ताणतणावामुळेही हृदयाच्या आरोग्याला धोका संभवू शकतो.