मुंबई :  इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत  स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपतर्फे शनिवारी करण्यात आलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातून देण्यात आला.

राज्यात एक हजाराहून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले. पोलिसांनी या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून काही वेळाने सोडून दिले.

कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ओबीसी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी जाहीर चर्चेचे आव्हान दिले. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुंडे म्हणाल्या, की सत्ताधारी पक्षातील काही मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने विरोधी पक्षांच्या सहकार्याने तातडीने हालचाली करायला हव्यात.