गुजरातमधील सोहराबुद्दिन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमकीप्रकरणी मुंबईत सुरू असलेल्या खटल्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुख्य आरोपी असतानाही वारंवार सुनावणीसाठी गैरहजर राहू देण्याबाबत सोहराबुद्दिनचा भाऊ रुबाउद्दिन आणि सीबीआयने शुक्रवारी पुन्हा एकदा न्यायालयाकडे आक्षेप नोंदवला. त्यांना गैरहजर राहण्याची मुभा देऊ नये, अशी मागणी केली. मात्र खटल्याचे नियमित कामकाज सुरू होईपर्यंत त्यांना गैरहजर राहण्याची मुभा दिली जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सीबीआयने शहा यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे आरोपपत्र दाखल केले होते. दोन्ही खटले महाराष्ट्रात वर्ग करण्यात आल्यावर त्यांची सध्या विशेष सीबीआय न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे. शहा यांना हजर राहण्याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. परंतु प्रत्येकवेळी त्यांच्याकडून गैरहजरीस परवानगी मागितली जाते आणि ती मान्य केली जाते. शहा मुंबईत-महाराष्ट्रात येतात. पण सुनावणीला येऊ शकत नाही, असा युक्तिवाद करीत सीबीआय व रुबाबुद्दीने या परवानगीस आक्षेप घेतला.
लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी असलेल्या सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण करून गुजरात पोलिसांनी त्यांची हत्या केली व ती चकमक दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचा एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापतीचीही अशाचप्रकारे गुजरात पोलिसांनी हत्या केली. या दोन्ही कटात  शहा यांची मुख्य भूमिका होती, असा आरोप आहे.