‘मालती माधव’वर गणगोतांचा अनोखा मेळा

वयाची नव्वदी पार केलेल्या शि. द. फडणीस यांनी चितारलेले व्यंगचित्र.. मंजिरी असनारे आणि विजय कोपरकर यांनी केलेले गायन.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या जीवनातील प्रसंगांना दिलेला उजाळा.. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘मालती माधव’ या  निवासस्थानी त्यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त गणगोतांचा असा अनोखा मेळा शुक्रवारी भरला.

भांडारकर रस्त्यावरील ‘मालती माधव’ इमारत फुलांनी, तोरणांनी, दिव्यांनी सजली होती. ठिकठिकाणी लावलेली पु.लं.ची छायाचित्रे लक्ष वेधून घेत होती. पु.ल. आपल्याकडेच बघून संवाद करत आहेत, असा भास होत होता.ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, नाटय़संमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, माधव वझे, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, मीना वैशंपायन, मुकुंद टाकसाळे, किरण शांताराम, संपादक भानू काळे, आनंद माडगूळकर, ज्येष्ठ गायक राजा काळे, आरती अंकलीकर-टिकेकर, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी, संतूरवादक सुहास व्यास, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, निवेदक सुधीर गाडगीळ, तबलावादक रामदास पळसुले, भरत कामत, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे याप्रसंगी उपस्थित होत्या. पु.ल. परिवाराचे दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी सर्वाचे स्वागत केले.

‘वाऱ्यावरची वरात’चे किस्से ऐकवत पु.लं.मुळे मी मत्स्यगोत्री झालो, या मोघे यांच्या टिप्पणीने खसखस पिकली. गदिमा आणि पु.लं.च्या आठवणी आनंद माडगूळकर यांनी सांगितल्या. वसंतराव देशपांडे यांच्याकडे गाणे शिकत असताना ‘रवी मी’ हे नाटय़पद गा म्हणून पु.ल. आग्रह करायचे, ही आठवण सांगून विजय कोपरकर यांनी हे पद गुणगुणले. ‘अंमलदार’ नाटकाच्या प्रयोगावेळी पाठांतराची तालीम करताना नाटकाचे लेखक पु.ल. हेच कसे मुद्दाम चुकले आणि त्यांनी दंड भरला हा किस्सा माधव वझे यांनी सांगितला.

..तर अफजलखानाशी गप्पा मारत बसले असते!

पु.ल. आणि सुनीताबाई यांच्यातील नात्याला खटय़ाळपणाची किनार होती. सुनीताबाई या माहेरच्या ठाकूर. त्यामुळे स्वयंपाकघराच्या दाराला पु.ल. नेहमी ‘ठाकूरद्वार’ असे म्हणत, अशी आठवण बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितली. एकदा गप्पा सुरू असताना ‘परमेश्वराने मला शिवाजी महाराजांची भूमिका दिली असती तर’ असे पु.ल. मला म्हणाले. त्यांचे हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच स्वयंपाकघरातून ‘मारायचे सोडून भाई अफजलखानाशी गप्पा मारत बसले असते’, अशी टिप्पणी सुनीताबाई यांनी केली होती. हा किस्सा पुरंदरे यांनी सांगताच सारे हास्यकल्लोळात बुडाले.