माघारी परतणाऱ्या पावसाने सप्टेंबरमधील तापमानाची तीव्रता काहीशी कमी केली होती, मात्र आता ऑक्टोबर हीटचा तडाखा बसू लागला आहे. रविवारी कमाल तापमानाने ३६ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली.  
रविवारी दुपारी सांताक्रूझ येथील तापमान तब्बल ३६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. यावेळी मुंबईच्या हवेतील दमटपणा मात्र गायब होता. त्यामुळे घामाचा त्रास होण्यापेक्षाही उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत होते. शनिवारीही सांताक्रूझ येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
ऑक्टोबर महिना हा ऋतू संक्रमणाचा काळ असतो. नैऋत्य दिशेने येणाऱ्या मोसमी वाऱ्यांची दिशा बदलून ते आग्नेय दिशेने म्हणजे जमिनीकडून वाहायला सुरूवात होते. जमिनीवरून येणारे वारे सोबत उष्णता घेऊन येतात. त्यामुळे या दिवसात तापमान अधिक वाढते. त्यातच सप्टेंबर महिन्यात कमाल तापमानाने ३७ अंश सेल्सिअसचा विक्रम केला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नेमके काय होणार याची भीती मुंबईकरांमध्ये आहे. मात्र शनिवार-रविवारी वाढलेले तापमान पुढील दिवसात कमी होणार असल्याचा दिलासा मुंबई हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
सोमवारी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला.
ऑक्टोबरमध्ये गेल्या दहा वर्षांत, १६ ऑक्टोबर २००८ रोजी सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सार्वकालिक विक्रम ३७.९ अंश सेल्सिअसचा असून २३ ऑक्टोबर १९७२ रोजी हे तापमान होते.