मुंबई विमानतळावर उतरणारे काही प्रवासी करोना तपासणी वा चाचणी करण्यास नकार देत असून, संबंधित अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन तपासणी व चाचणी करण्यास असहकार्य करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेची किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. विमानतळ प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या करोनाविषयक तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी प्रवाशांना केले.
महापौरांचे आवाहन..
परदेशांतून, तसेच परराज्यांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची करोना तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वीच करोना चाचणी करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही प्रवासी तपासणी करण्याबाबत वाद घालत असून अशा प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. बाधित प्रवाशांमुळे मुंबईकरांना संसर्ग होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे, असे महापौर म्हणाल्या. प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 12:30 am