मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना कुठलीही अट नको. त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आखली आहे. योजना राबविताना शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक द्या. त्याचवेळी या योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी बँकानी चुकीची यादी दिल्याचे निदर्शनास आल्यास सबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना  दिले.  त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळावा यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सोमवापर्यंत बँकानी द्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बँकाना दिले.

शेतकऱ्याला आपण काही देतोय या भावनेपेक्षा शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपण घेतोय या भावनेपोटी कर्जमुक्तीची योजना राबविली जात आहे. जिल्हास्तरीय यंत्रणांनी ही भावना लक्षात घेऊन योजनेची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करतानाच  दिलेल्या वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करा.आधार प्रमाणिकरणासाठी इंटरनेटची आवश्यकता असून दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नाही अशा गावातील शेतकऱ्यांना नजिकच्या गावात नेऊन तेथील आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण कराव्यात.

अशावेळी शेतकऱ्यांची ने-आण केल्यास त्यांना हेलपाटे मारावे लागणार नाही. त्यासाठी बसची व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.