News Flash

बिल्डरांना चाप लावणाऱ्या संजय पांडे यांची बदली

सदनिकांच्या क्षेत्रफळात घाटा मारून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना चाप लावणारे वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची अवघ्या चार महिन्यांत

| March 22, 2015 03:31 am

सदनिकांच्या क्षेत्रफळात घाटा मारून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या  बिल्डरांना चाप लावणारे वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची अवघ्या चार महिन्यांत बदली करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती त्यांना मिळाली असली तरी पुणे येथे महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात त्यांची कमी महत्त्वाच्या जागेवर बदली करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकपदावर बढती मिळाल्यानंतर संजय पांडे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली होती. परंतु तेथे काहीच काम नसल्याने त्यांनी त्याबद्दल गृह विभागाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदावर नियुक्ती करण्यात आली होती.
या विभागात रुजू होताच त्यांनी अडगळीत पडलेल्या वैधमापन शास्त्र कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. वजन व मापे यांच्या आधारावर जिथे-जिथे आर्थिक व्यवहार होतात, त्या वजन व मापांची वैधमापन विभागाकडून पडताळणी करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदाच या कायद्याच्या कक्षेत बांधकाम व्यवसाय आणला. त्यानुसार त्यांनी बिल्डरांनी विकलेल्या सदनिकांचे क्षेत्रफळ तपासल्याशिवाय व तसे वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदनिका खरेदी-विक्रीची नोंदणी करू नये, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांना काढले. त्यानुसार राज्यभरात त्याची कारवाई सुरू होताच बिल्डर लॉबीत खळबळ उडाली. तेव्हापासून त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.
राज्यात १९९५ ते १९९९ दरम्यान झालेल्या चर्मोद्योग घोटाळ्यात अनेक दिग्गजांना तुरुंगात पाठविणाऱ्या संजय पांडे यांची मात्र पुढे परवड सुरू झाली. त्यांची पदोन्नती प्रलंबित ठेवण्यात आली व सतत अडगळीच्या किंवा कमी महत्त्वाच्या जागेवर बदल्या करणे असे प्रकार सुरू झाले. आता बिल्डर लॉबीला दणका देणाऱ्या पांडे यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली, परंतु त्यांची पुणे येथे महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली. या विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रमुख असतात. परंतु त्यापदाचा दर्जावाढ करून पांडे यांची त्याजागी बदली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 3:31 am

Web Title: officer sanjay pandey who cracked down on builders transferred
Next Stories
1 सी- लिंकच्या टोलमध्ये १५ टक्क्यांनी वाढ
2 ‘गायब’ कामांच्या चौकशीची मागणी
3 ‘टीआयएफआर’मध्ये अनधिकृत बांधकामांचा घाट!
Just Now!
X