वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने जुनी झाल्यामुळे आता त्यांच्यासाठी २१ नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाडय़ा खरेदी करण्याचा घाट पालिकेने घातला आहे. एरवी नागरी कामांचे प्रस्ताव विलंबाने सादर करणाऱ्या प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीचा प्रस्ताव मात्र मोठय़ा तत्परतेने मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
पालिका उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुख आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पालिकेकडून उपलब्ध करण्यात येणारी स्कॉर्पिओ आणि अन्य वाहने जुनी झाली आहेत. तसेच ती वारंवार नादुरुस्त होत असतात. या जुन्या वाहनांच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याने आणि ती कालबाह्य़ झाल्याने महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या डिझेलवर धावणाऱ्या २१ स्कॉर्पिओ गाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वाहन खरेदीसाठी पालिका तब्बल १ कोटी ६३ लाख ६५ हजार १४० रुपये खर्च करणार आहे. मात्र या गाडय़ा वातानुकूलित आहेत की साध्या याबाबतचा उल्लेख प्रस्तावात करण्यात आलेला नाही.
पालिकेच्या ताफ्यात आजघडीला किती वाहने आहेत, त्यांची सद्य:स्थिती काय आहे, त्यांच्या देखभालीवर नेमका किती निधी खर्च करावा लागत आहे, नव्या स्कॉर्पिओ खरेदी केल्यावर जुन्या वाहनांचे काय करणार, त्या भंगारात काढणार की त्यांचा लिलाव करणार आदींबाबत प्रस्तावात कोणताच उल्लेख नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला समितीच्या बैठकीत द्यावी लागतील. तरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे.
भाडय़ाने १९५ वाहने घेणार
पालिकेच्या विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी वाहनांची गरज भासत आहे. त्यामुळे पालिकेने १९५ टुरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला एक वाहन दोन हजार किलोमीटर धावेल असा अंदाज बांधून त्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. एका वाहनाला प्रतिमहिना ३०,७०० रुपये ते ३,९०० रुपये भाडे देण्यात येणार आहे.