ब्रिटनसह अकरा देशांच्या व्हिसासाठी प्रक्रिया कार्यालये देशातील निवडक शहरांत सुरू करण्यास संबंधित देशांनी व्हीएफएस ग्लोबल या आस्थापनेस परवानगी दिली आहे. अकरापैकी दोन देशांची प्रक्रिया कार्यालये मुंबई आणि पुणे येथे ६ जुलैपासून सुरू होतील, तर उर्वरित देशांसाठी केवळ नवी दिल्ली येथेच सुविधा असेल.

५१ देशांसाठी व्हिसा कागदपत्रांची प्रक्रिया करण्याचे काम व्हीएफएस ग्लोबल (इंडिया) या आस्थापनेकडून केले जाते. व्हिसा मंजुरीचे काम अंतिमत: संबंधित  दूतावासामार्फत होते. टाळेबंदीच्या शिथिलीकरणाबरोबर त्यापैकी ११ देशांच्या व्हिसासाठी ही प्रक्रिया कार्यालये सुरू होत आहेत. सध्या प्रवासावर निर्बंध असले तरी भविष्यात ते उठवल्यानंतर होणाऱ्या प्रवासासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे व्हीएफएसने सांगितले.

बेलारूस, डेन्मार्क, डोमिनिकन रिपब्लिक, आर्यलड, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, दक्षिण कोरिया, तुर्की, युएई आणि ब्रिटन (युनायटेड किंग्डम) येथील विशिष्ट व्हिसा विभागांसाठी व्हिसा प्रक्रिया सुरू होईल. ब्रिटन, यूएई आणि तुर्की देशांसाठी सर्व व्हिसा विभागांची प्रक्रिया सुरू होईल. तर इतर देशांसाठी मर्यादित प्रकारची व्हिसा सुविधा असेल. ब्रिटन आणि आर्यलडच्या व्हिसासाठी प्रक्रिया कार्यालये देशभरात मुंबई आणि पुणेसह ११ शहरांत ६ जुलैपासून सुरू होतील. तर यूएईसाठीची प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे.

ब्रिटनच्या व्हिसामध्ये प्राधान्य व्हिसाची सुविधा देण्यात येणार नाही. तसेच इंग्लंडमधील प्रवेशाबाबतच्या नियमांसाठी अधिकृत संकेतस्थळ पाहणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

थेट दारात येऊन व्हिसा प्रक्रिया

करोनामुळे अंतर पाळणे, गर्दी टाळणे तसेच वाहतुकीच्या अडचणी या अनुषंगाने थेट घरी अथवा कार्यालयात येऊन व्हिसा प्रक्रियेसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्याची सुविधा व्हीएफएसने सुरू केली आहे. ज्या देशांना बायोमॅट्रिक पडताळणीची गरज आहे त्याची पूर्ततादेखील यामध्ये केली जाईल असे व्हीएफएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.