पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवताच कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी घरी सोडल्याने वाहतुकीवर ताण येतो आणि गंभीर प्रश्न निर्माण होतात. हे प्रकार टाळण्यासाठी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सोडण्याची सूचना सरकारी कार्यालयांना करण्यात आली असून खासगी कंपन्यांनाही तशी सूचना करण्यात येणार आहे. असे घडल्यानंतर घरी जाण्यासाठी महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सर्वच कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्यात येते. घरी पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ उडते आणि त्याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण पडतो. त्याचबरोबर अनेक गंभीर समस्याही निर्माण होतात. या संधीचा फायदा घेत टॅक्सी-रिक्षाचालक प्रवाशांची लूट करतात. यावर तोडगा म्हणून पालिकेने कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने घरी पाठविण्याची सूचना सरकारी कार्यालयांना केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आर. ए. कुंदन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ही शिफारस करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरी सोडताना प्रथम महिलांना प्राधान्य द्यावे. त्यानंतर ज्येष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि मग इतर कर्मचाऱ्यांना घरी सोडावे, असेही कार्यालयांना कळविण्यात आले आहे, असे सांगून आर. ए. कुंदन म्हणाल्या की, खासगी कंपन्यांच्या कार्यालयांनाही याबाबत एसएमएसद्वारे ही सूचना करण्यात येणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधता यावा यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असून समन्वय अधिकाऱ्यामुळे मदतकार्यास वेग येईल, असेही त्या म्हणाल्या.