|| सुहास जोशी

पूरक विषयांच्या ऑनलाइन वर्गामध्ये वाढ; भाषा, नृत्य, पर्यावरण, शेअर बाजार अशा विषयांची चलती

मुंबई : संपूर्ण टाळेबंदीनंतर पूरक विषयांच्या ऑनलाईन वर्गामध्ये वाढ झाली आहे. भाषा, नृत्य, संगीत, शेअर बाजार, मानसिक आरोग्य, आहार अशा विषयांना यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे यातील काही उपक्रम हे सशुल्क असून त्यांनादेखील प्रतिसाद मिळत आहे.

शासनाने सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत र्निबध घातले होते, पण ते वाढवून २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केल्यानंतर या काळात पूर्णपणे घरी बसून काय करायचे यावर उपाय म्हणून असे उपक्रम सुरू झाले आहेत. तर आतापर्यंत ऑफलाइन असलेले पूरक विषयांचे वर्ग पुढे सुरू ठेवण्यासाठी अनेकांनी ऑनलाइन वर्गाचा आधार घेतला. पर्यावरणविषयक बहुतांश उपक्रम हे चार भिंतीबाहेरच चालतात. पण लॉकडाउन परिस्थितीत अनेक तज्ज्ञांनी याविषयी विशेष ऑनलाइन वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. सरीसृप प्राणीतज्ज्ञ वरद गिरी यांनी गेल्याच आठवडय़ात ‘जैवविविधता आणि आपण’ या विषयावर दिवसभर नि:शुल्क ऑनलाइन सादरीकरण केले होते. पुढील काही दिवसात ते सरीसृप आणि उभयचर प्राण्यांवर पाच दिवसाचे अभ्यासवर्ग घेणार आहेत. तर स्प्राउट या संस्थेनेदेखील चार आठवडय़ाचे अभ्यासक्रम आखले आहेत.

गेल्या काही काळात लोकप्रिय झालेले झुंबा नृत्य प्रकाराच्या ऑनलाइन वर्गही वाढले आहेत. ऑनलाइन वर्गामुळे आपले नेहमीचे सहकारी भेटतात आणि घरात अडकून असतानाही दिवस चांगला जातो, असे हिमानी मुळ्ये यांनी सांगितले. तर श्रुती साळुंखे या नृत्य प्रशिक्षक सांगतात की, त्यांनी या २१ दिवसांत ‘संपूर्ण कुटुंबासाठी झुंबा’ असे आव्हान स्वीकारले असून सर्वाना मोफत शिकवणार आहेत. सध्या आर्थिक स्थिती कठीण असली तरी शेअर बाजारच्या बातम्या, चर्चाबरोबरच त्यासंबंधीच्या यू-टय़ूब चॅनेलची जाहिरातही होत असते. त्यातूनच बाजारविषयक ‘वेबिनार’ना वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ८ हजार रुपयांपासून पुढे शुल्क असलेले हे वेबिनार पाहणाऱ्याची संख्या वाढत आहे. तर या लॉकडाउनचा वापर करण्यासाठी गुंतवणूक, सहकार कायदे वगैरे विषयक यू-टय़ूब चॅनल नव्याने सुरू केल्याचे सहकार क्षेत्रातील निवृत्त अधिकारी धनराज खरटमल यांनी सांगितले.

पहिलाच व्हिडीओ मृत्युपत्राचा

सहकार कायदे, गुंतवणूकविषयक मार्गदर्शन करण्यासाठी नुकत्याच सुरू झालेल्या एका यू-टय़ूब चॅनेलवर पाहिलाचा व्हिडीओ ‘मृत्यूपत्र कसे कराल?’ हा आहे. एरवीपण मृत्युपत्र हा विषय सर्वजण गांभीर्याने घेत नाहीत. पण सद्यस्थितीत त्याचे महत्त्वदेखील तितकेच असल्यामुळे या व्हिडीओने सुरवात केल्याचे या तज्ज्ञानी सांगितले.

लॉकडाऊन बर्डिग चॅलेंज

बर्ड काऊंट इंडिया या संकेतस्थळाने ‘लॉकडाऊन बर्डिग चॅलेंज’ हा खास उपक्रमच हाती घेतला आहे. ज्यामुळे निवासी भागातील पक्ष्यांच्या नोंदी अद्ययावत होतील. यामध्ये दिवसातून दोन वेळा ठराविक ठिकाणावरून पक्ष्यांची निरीक्षणे नोंदवायची आहेत. नेमक्या कोणत्या नोंदी हव्या, काय पाहायचे याच्या सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत.  याच उपक्रमात भल्या पहाटे चार वाजता आणि रात्री १० वाजता होणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाच्या नोंदीही केल्या जाणार आहेत.