मध्य रेल्वेमार्गावर घाटकोपर-विक्रोळी या स्थानकांदरम्यान सकाळी सकाळी ओव्हरहेड वायर तुटून छोटा स्फोट झाल्याने सक्तीच्या मेगाब्लॉकपेक्षाही जास्त हालअपेष्टा या मार्गावरील प्रवाशांच्या वाटय़ाला आल्या. ही घटना एवढी मोठी होती की, अप आणि डाऊन या दोन्ही बाजूंची धीम्या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास बंद होती. या बिघाडाचा फटका संध्याकाळपर्यंत मध्य रेल्वेच्या सर्वच सेवांना बसला. दुपारी उशिरापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक एक ते दीड तास उशिराने चालत होती.
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेने कामावर जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच दैना झाली. धीम्या मार्गावरील वाहतूक माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात आल्याने जलद मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. या सगळय़ा गोंधळामुळे मध्य रेल्वेच्या गाडय़ा तब्बल दोन ते तीन तास विलंबाने धावत होत्या. तर मुंबईकडे जाणाऱ्या २६ व कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या ४३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ठाण्यापुढील सर्व स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. ठाणे, मुलुंड परिसरातील अनेकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग व लाल बहादूर शास्त्री मार्गावरून कार्यालयाच्या दिशेने प्रवास आरंभल्याने बसगाडय़ांनाही मोठी गर्दी होती. रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यास सायंकाळचे चार वाजले. मात्र, त्यानंतरही वाहतूक २०-२५ मिनिटे विलंबाने सुरू होती. ओव्हरहेड वायर आणि पेंटोग्राफ यांच्यात घर्षण होऊन ओव्हरहेड वायरला झटके बसले. तसेच पेंटोग्राफ काहीसा वाकल्याने ही वायर तुटल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.