ओला आणि उबर या दोन प्रायव्हेट टॅक्सी कंपन्यांच्या चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ओला, उबरचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. युनियनचे नेते सचिन अहीर यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. चालकांनी नेमक्या काय मागण्या केल्या आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. चालकांचे काय म्हणणे आहे तेदेखील या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांपुढे मांडले.

या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ओला आणि उबर चालक तसेच कामगार संघटनेच्या नेत्यांसोाबत एक बैठक बोलावली जाईल. या बैठकीत ओला आणि उबर चालकांनी केलेल्या मागण्यांबाबत चर्चा होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान हिवाळी अधिवेशनानंतर होणाऱ्या बैठकीच्या आधी परिवहन सचिव चालकांच्या मागण्या आणि त्यावर काय तोडगा काढता येईल यासंदर्भातला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

उबर आणि ओलाच्या चालकांनी भारतमाता सिनेमागृह ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं होतं. या बैठकीत चालकांच्या मागण्या काय आहेत यावर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन मागण्यांवर विचार करू असे सांगितल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.