मुंबई ते पुणे प्रवासासाठी कमल भाटिया या उद्योजकाला ‘ओला’या खासगी टॅक्सीसेवेचे ८३ हजार ३९५ रुपयांचे ‘अवाढव्य’ देयक आले. भाटिया यांनी याबाबत टॅक्सीचालकाशी वाद घातल्यानंतर त्याने ४ हजार ८८ रुपये इतके देयक भाटिया यांना दिले.

मुंबईत घाटकोपर येथे राहणाऱ्या भाटिया यांनी एका घरगुती कार्यक्रमासाठी पुण्याला जाण्याकरिता ओला टॅक्सी केली होती. प्रवास पूर्ण झाल्यानंतर टॅक्सी चालकाने भाटिया यांना हे अवाढव्य देयक दिले. ५० किलोमीटर वेगाने भाटिया यांनी १४ तासांचा प्रवास केल्याचे या देयकात नमूद करण्यात आले होते.

या देयकात ५ हजार ३८२ रुपयांचा करही लावण्यात आला होता. ७ हजार ९२ किलोमीटरचा प्रवास केल्याचेही या देयकात म्हटले होते.ओला अ‍ॅपच्या फ्लीट ऑपरेटर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे अवाढव्य देयक भाटिया यांना दिले गेले असल्याचे सांगण्यात येते. टॅक्सीचालकाशी वाद घातल्यानंतर अखेर ३४७ किलोमीटरसाठी भाटिया यांनी ४ हजार ८८ रुपये टॅक्सीचालकाला चुकते केले.