काळय़ापिवळय़ा टॅक्सीच्या प्रवासी संख्येत दीड लाखांची घट
कमी खर्चात हव्या त्या ठिकाणी पोहोचवणारी अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवा म्हणून लोकप्रिय होत असलेल्या ओला, उबर यांसारख्या टॅक्सीसेवेची प्रवासी संख्या अवघ्या वर्षभरात पाच हजारांवरून अडीच लाखांवर पोहोचली आहे. एका टॅक्सीचालकाला दिवसात सरासरी चार भाडी मिळत असताना ओला-उबेरचालक दिवसभरात आठहून अधिक भाडी मिळवत असल्याचे दिसून आले आहे. ओला- उबरचा सरळ फटका काळय़ापिवळय़ा टॅक्सींच्या चालकांना बसला असून त्यांचे प्रवासी दीड लाखांनी घटले आहेत.
mv03साधारण चार वर्षांपूर्वी आलेल्या मेरू, टॅब या फ्लीट टॅक्सींचे पहिले चार किलोमीटरचे भाडे व त्यानंतर प्रति किलोमीटरला २२ ते २७ रुपयांचा दर हा काहीसा चढा होता. मात्र तरीही लांबच्या पल्ल्यासाठी साध्या टॅक्सीपेक्षा मेरू, टॅबला प्रतिसाद मिळू लागला होता. ओला, उबर या नव्या प्रकाराने मात्र थेट परंपरागत टॅक्सींच्या पोटालाच हात घातला आहे. गेल्या वर्षभरात काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या दीड लाखाने कमी झाली असून ओला- उबेरकडे अडीच लाख प्रवासी वळले आहेत. मेरू, टॅबचे प्रवासी वाढलेले नसले तरी या सेवेतून दररोज साधारण ३० हजार प्रवाशांची वाहतूक होते. मुंबई महानगरात आजमितीला १ लाख ५ हजार रिक्षा आहेत. पश्चिम उपनगरात ६६ हजार, तर पूर्व उपनगरात ३९ हजार रिक्षा आहेत. याशिवाय ३८ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी, ओला-उबरच्या ३० हजार टॅक्सी, तर मेरू-टॅबच्या ४,८०० टॅक्सी आहेत. गेल्या वर्षभरात ओला, उबरच्या वाहनांत व प्रवासी संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीची प्रवासी संख्या तीन लाखांहून दीड लाखांवर घसरली असून ओला- उबरचे प्रवासी अवघ्या पाच हजारांहून तब्बल अडीच लाखांवर गेले आहेत.
वाहनांची संख्या लक्षात घेता साध्या टॅक्सींना दिवसातून चार ते पाच प्रवासी मिळवणे कठीण जात असून ओला-उबरच्या चालकांकडे सरासरी आठ प्रवासी येत आहेत.
काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या वाढली असली तरी आमच्या २० हजारांहून अधिक गाडय़ा वाहनांशिवाय आहेत.
‘‘आमचे अनेक चालक सध्या ओला, उबर, मेरू, टॅबकडे जात आहेत. सध्या प्रत्येक टॅक्सीला सुमारे ६० ते ७० किलोमीटरचा व्यवसाय मिळतो. त्यातून दिवसाला ७०० ते ८०० रुपये उत्पन्न होते.
मात्र गेल्या वर्षीपर्यंत हे उत्पन्न दुप्पट होते,’’ अशी माहिती मुंबई टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष ए. क्वाड्रोस यांनी दिली.

अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा
ओला, उबेर यांसारख्या कंपन्यांच्या मालकीची वाहने नाहीत किंवा त्या वाहनचालकांना रोजगार देत नाहीत. फक्त अ‍ॅपआधारे ते प्रवासी व वाहनचालक यांची गाठ घालून देतात.

फ्लीट टॅक्सी
मेरू, टॅब या कंपन्यांनी काही वाहने विकत घेतली आहेत. वाहनचालकांना दरदिवशी १३०० रुपये कंपनीकडून दिले जातात. भाडे मिळाले नाही तरी ही रक्कम वाहनचालकांना देणे कंपनीला बंधनकारक असते.