ओला-उबर कंपन्यांच्या चालकांनी पुकारलेल्या संपावर मंगळवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे. ओला, उबर कंपन्यांनी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारची वेळ मागितली आहे. मात्र, तोपर्यंत सलग दुसऱ्या दिवशीही मुंबई- पुण्यातील ओला- उबरच्या गाड्या बंदच राहणार आहेत.

ओला- उबर कंपन्यांकडून हमीपेक्षा कमी उत्पन्न दिले जाते असा आरोप करत चालकांनी सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली. त्यामुळे मुंबई, पुण्यासह देशभरातील काही शहरांमधील ओला- उबरची सेवा पूर्णपणे बंद पडली. राज्यात या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून पाठिंबा देण्यात आला. जवळपास ४५ हजार चालकांनी संपात भाग घेतल्याने या दोन्ही शहरांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक ओला, उबरच्या गाडय़ा रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. मुंबईत या कंपन्यांच्या गाड्यांची मोडतोडही करण्यात आल्याने बहुतेक चालकांनी गाड्या न चालविणे पसंत केले. त्यामुळे ओला, उबर गाड्यांनी नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले होते.

मंगळवारी देखील हा संप सुरु राहणार आहे. मात्र, आज दिवसभरात या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. ओला, उबर कंपन्यांनी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारची वेळ मागितली आहे. यातून तोडगा निघून पुढील निर्णय होईपर्यंत ओला, उबर चालक-मालक ऑफलाइन राहतील, असे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने म्हटले आहे.

काय आहेत ओला, उबर चालकांच्या प्रमुख मागण्या?
> चालकांना दरमहिना सव्वा लाख रुपये उत्पन्नाची हमी देण्यात आली होती. ती पूर्ववत करावी.
> कमी दराचे आरक्षण बंद व्हावे.
> कंपनीने स्वत:च्या ताफ्यातील गाड्या बंद कराव्यात.

…म्हणून चालकांचे उत्पन्न कमी 

ओला, उबर या खासगी टॅक्सींना गेल्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या कंपन्यांमध्ये गाड्या लावताच गाडीमालक किंवा चालकाला सुरुवातीला चांगले भाडे उपलब्ध करून दिले जात होते. त्यामुळे दररोज तीन ते चार हजार रुपयांचे उत्पन्न चालकाला मिळत होते. मात्र या कंपन्यांच्या चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. त्यातच ओला, उबर कंपन्यांकडूनही गाडीसाठी कर्ज उपलब्ध केले जात होते. कर्जाची रक्कम झटपट वसूल व्हावी यासाठी उबरकडून याच वाहन चालकांना अधिक भाडी देण्यात येत होती. त्यामुळे अन्य वाहन चालकांना कमी भाडे मिळू लागले. परिणामी अन्य चालकांचे उत्पन्न कमी होऊ लागले. याबाबत कंपन्यांकडेही चालकांकडून विचारणा होऊ लागल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. याविरोधात अनेकदा आंदोलन केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नव्हती. शेवटी चालकांनी संपाचे अस्त्र उगारले. मुंबईसह, पुणे, दिल्ली, नोएडा, तेलंगणा, बंगळुरू, चेन्नई येथे हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र मुंबई, पुण्यात या आंदोलनाचा चांगलाच पाठिंबा मिळाला आणि ६० टक्केहून अधिक चालक यात सहभागी झाले. नागपूरमध्येही आंदोलनाला बऱ्यापैकी पाठिंबा मिळाला.