मागण्या मान्य न झाल्याने ओला, उबर चालकांनी शनिवार (१७ नोव्हेंबर) रात्री ११ वाजल्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

ओला-उबर चालक सोमवारी सकाळी १० वाजता भारतमाता ते विधान भवन असा मोर्चा काढणार आहेत. ओला, उबर चालकांचा दिवाळीपूर्वी बारा दिवस सुरू राहिलेला संप परिवहन विभागाशी झालेल्या चर्चेनंतर १५ नोव्हेंबपर्यंत स्थागित करण्यात आला होता. त्यानंतर मागण्यांवर दोन दिवसांत परिवहन विभाग व ओला, उबर व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, अन्यथा संप कररण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि मराठी कामगार सेनेने दिला होता. तोडगा न निघाल्याने ओला, उबर टॅक्सी चालक-मालकांच्या संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात चालक आपल्या कुटुंबीयांसह सामील होतील, अशी माहिती मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. संघटनेकडून १३ मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये मिनी, मायक्रो, गो गाडय़ांमध्ये प्रति किलोमीटर १२ रुपयेऐवजी ५० रुपये बेस फेअर द्यावा, प्रतीक्षा कालावधी दर दोन रुपये मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे.