भाडेवाढीमुळे खिशालाही कात्रीच; दोन दिवसांत निर्णय न झाल्यास संप अटळ

मुंबई : ओला, उबर टॅक्सीचालकांनी दिवाळीपूर्वी पुकारलेला संप, त्यामुळे झालेले हाल आणि जादा उत्पन्न मिळावे यासाठी टॅक्सीचालकांसाठी गर्दीच्या वेळेत केलेल्या बदलानंतर दुप्पट भाडय़ामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. आता पुन्हा एकदा ओला, उबरचालक संघटनांनी मागण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे.

संप झाल्यास पुन्हा प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओला, उबर व्यवस्थापन असो की संघटना, त्याच्याकडून प्रवाशांचा मात्र विचार होताना दिसत नाही.

२२ ऑक्टोबरपासून सलग १२ दिवस ओला, उबर चालक-मालकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. दिवाळी सण पाहता हा संप मागे घेण्यात आला. १५ नोव्हेंबपर्यंत यावर तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु तोडगा निघू शकला नसल्याने पुन्हा एकदा १७ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा देण्यात आला आहे. तर १९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व मराठी कामगार सेनेतर्फे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्या वेळी दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर ओला-उबर चालक-मालक १७ नोव्हेंबरपासून संपावर जातील, असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. ओला, उबर व्यवस्थापनाने मागण्यांसंदर्भात एक प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करणार आहे. त्यावर दोन दिवसांत विचार होणे अपेक्षित असल्याचे अहिर म्हणाले. मात्र हा संप झाल्यास पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

दिवाळीत केलेल्या संपानंतर ऐन गर्दीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आपसूकच जादा भाडे आकारले जात असून प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. ओला, उबर टॅक्सीचालकांसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ११ अशी वेळ ठरविण्यात आली आहे. हा बदल प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहे.

सध्या चर्चगेट ते बोरीवलीपर्यंतच्या ओला मायक्रो गर्दीच्या वेळी गाडीतील प्रवासासाठी एक हजार रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागते. तर ठाणे पर्यंतच्या मिनी गाडीतून प्रवास केल्यास मिनीसाठी ७४७ आणि प्राईम गाडीसाठी ९०० रूपयांपर्यंत भाडे द्यावे लागते. हे भाडे दिवाळीआधी आकारण्यात येणाऱ्या भाडय़ापेक्षाही दुप्पटच आहे. चर्चगेट ते सीएसएमटीपर्यंत बिगर वातानुकूलित शेअर टॅक्सीसाठी तर ६५ रूपये भाडे आहे. सध्याच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीपेक्षा पाच पटीनेही जास्त भाडे आहे. अशाचप्रकारचे भाडे हे उबर गाडय़ांचेही आहे.