21 October 2018

News Flash

मुंबईचा सांस्कृतिक वारसा

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

अथांग समुद्रकिनारा, वाऱ्यासंगे डुलणाऱ्या नारळी-पोफळीच्या वाडय़ा, मध्येच उभी असलेली टुमदार घरे, कच्चा रस्ता, मध्येच धावणाऱ्या बैलगाडय़ा, टांगा, बग्गीमधून फेरफटका मारणारे धनिक असे साधारण १८६० च्या सुमारास मुंबापुरीतील चित्र होते. वृक्षवल्लीने नटलेले मुंबई बंदर व्यापारउदिमाच्या निमित्ताने व्यापाऱ्यांना खुणावू लागले होते. त्यामुळे आसपासच्या इलाख्यातील व्यापाऱ्यांची आपसूकच मुंबईच्या दिशेने पावले वळली. काळाची पावले ओळखून अनेक व्यापाऱ्यांनी मुंबईशी आपले व्यावसायिक नाते जोडले. कालौघात हे व्यापारी आणि मुंबईचे नात घट्ट झाले आणि हे ‘परप्रांतीय’ कधी मुंबईकर होऊन गेले हे त्यांनाही कळलेच नाही. त्यापैकीच एक म्हणजे ख्यातनाम व्यापारी केशवजी नायक (नाईक नव्हे).

व्यापारात जम बसल्यानंतर १८६०-६२ या तीन वर्षांमध्ये केशवजी नायकांनी आताच्या गिरगाव परिसरातील खाडिलकर मार्गावर सहा चाळी बांधल्या. तीन खोल्या, दोन खोल्या आणि एक खोली अशी चाळींतील घरांची रचना. एकमेकांसमोर एक रांगेत उभ्या राहिलेल्या या सहा एकमजली चाळींमध्ये तब्बल १५० कुटुंबांसाठी घरं उभी राहिली. दोन चाळीमधून जाणारा कच्चा रस्ता, चाळींच्या दोन्ही टोकाला जिना, घरामध्ये शेणाने सारवलेली जमीन अगदी गावातील घराचा भास व्हावा अशीच ही घरे. कोकणातील रत्नागिरी आणि आसपासच्या पंचक्रोशीतील ब्राह्मण मंडळी कामानिमित्त मुंबईत दाखल झाली आणि या चाळी त्यांचा आधार बनल्या.

गावाकडून मुंबईत आल्यानंतर या रहिवाशांना आधार असा नव्हता. नवे गाव, नवी माणसे, नातेवाईकांपासून दूर आलेल्या या मंडळींनी शेजाऱ्यांशी एक वेगळचे नाते जोडले. त्यामुळे सुरुवातीपासूनच या चाळींमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते. शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणे हा चाळकऱ्यांचा धर्मच बनला होता. चाळींमध्ये लग्न, मुंज असो वा हळदी-कुंकू समारंभ किंवा मग एखाद्या माहेरवाशिणीची मंगळागौर. अगदी अवघ्या चाळीतील रहिवासी एकमेकांना मदतीचा हात देत सण-उत्सव, कार्यक्रम साजरे करायचे. चाळीत एखाद्याच्या लग्नाची सुपारी फुटली की उत्साहाला भरतेच यायचे. दोन चाळींच्या मधल्या कच्च्या रस्त्यावर मंडप उभारला जायचा. चाळकऱ्यांपैकी कुणी तरी खडय़ा आवाजात मंगलाष्टक म्हणायचे आणि विवाह सोहळा पार पडायचा. धूमधडाक्यात वरातही निघायची. जवळच असलेल्या फडके गणेश मंदिराला वळसा घालून वरात चाळीमध्ये दाखल व्हायची. त्यानंतर यथासांग भोजनाची पंगत उठायची. चाळीच्या गॅलरीत एका रांगेत भोजनासाठी पंगती बसत. मंडप बांधण्यापर्यंत अगदी विवाह सोहळा पार पडेपर्यंत सर्व कामात चाळीतील तरुणांबरोबर महिलावर्गही पुढे असायचा. त्या काळी दररोज घरातील जमिनी शेणाने सारविल्या जात. चाळीतील १५० खोल्यांमधील जमीन सारवण्यासाठी शेण यायचे कुठून? पण प्रत्येक घरात शेणगोळा पोहोचता करण्यासाठी एक नोकरच कामाला ठेवला होता. चाळींमध्ये कटाक्षाने ओवळेसोपळे पाळले जाई. बहुतांश घरातील धुणीभांडी गडीच करायचे. पण त्यांना स्वयंपाकघरात प्रवेश निषिद्ध होता. या मंडळींची निवासाची व्यवस्था चाळीच्या एका बाजूला होती. ही सर्व मंडळी कोकण पट्टय़ातील. शिमग्याच्या वेळी ही मंडळी खेळे, नमन सादर करून चाळकऱ्यांचे मनोरंजन करायची.

नाईकांची चाळ

केशव नायक या चाळींचे मालक. पण कालौघात आडनावाचा अपभ्रंश होऊन त्या ‘नाईकांच्या’ चाळी बनल्या. मुंबईमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव याच चाळींमध्ये सुरू झाला आणि त्यामुळे ती नावारूपाला आली. पण त्यापलीकडे या चाळीची महती आहे. तो पारतंत्र्याचा काळ होता. ब्रिटिशांचे साम्राज्य उलथवून लावण्यासाठी देशभरात क्रांतिकारक उठाव करीत होते. त्याच वेळी महात्मा गांधीजींनी दिलेला अहिंसेचा मंत्र जपत ब्रिटिशांविरोधात चळवळी उभ्या राहत होत्या. सगळीकडे भारावलेले वातावरण होते. या लढय़ात मोठय़ा संख्येने तरुण मंडळी स्वत:ला झोकून देत होती.

बाळ गंगाधर टिळकांच्या विचाराने तरुण भारावले होते. अठरापगड जातींमध्ये विखुरलेला समाज एकत्र येणे अवघड होते. अखेर लोकमान्यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी १८९३ मध्ये पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. केशवजी नाईकांच्या चाळीतील रहिवासी आणि लोकमान्यांचे निकटवर्तीय नरहरशास्त्री गोडसे आणि अन्य काही रहिवाशांनी चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला. चाळीच्या गॅलरीत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सार्वजनिक सभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक १५ सप्टेंबर १९०१ रोजी मुंबईमध्ये आले होते. चाळीत झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान दस्तुरखुद्द लोकमान्यांनी भूषविले.

सावरकरांचे पिस्तूल

स्वातंत्र्याच्या लढय़ाच्या इतिहासात केशवजी नाईकांच्या चाळींचा उल्लेख सापडत नाही. मात्र चाळीतील काही मंडळी गुप्तपणे देशकार्य करीतच होती. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे काही निकटवर्तीय सहकारी याच चाळींमध्ये वास्तव्यास होते. गोपाळराव पाटणकर, त्र्यंबकराव मराठे हे त्यापैकीच. त्यामुळेच सावरकरांनी लंडनहून अत्यंत गुप्तपणे भारतात धाडलेले पहिले पिस्तूल केशवजी नाईकांच्या चाळीत पोहोचले. सावरकरांच्या सांगण्यावरूनच पाटणकर यांच्या ताब्यात पिस्तूल देण्यात आले होते.

मान्यवरांचा राबता

हिंदू महासभेचे अध्यक्ष नारायण अनंत  देशमुखही याच चाळीतील रहिवासी. त्यामुळे हिंदू महासभेशी संबंधित अनेक मंडळींचा चाळीमध्ये राबता होता. अनेक मान्यवरांच्या वास्तव्याने आणि गणेशोत्सवामुळे या चाळीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मुंबई स्टेटचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, वीर वामनराव जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे, केशवसुत अशा अनेक मान्यवरांच्या वास्तव्याचे दाखले आजही चाळीतील रहिवासी देत असतात. त्या काळी चाळीमध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरायची आणि या शाखेमध्ये चाळीतील मुली मोठय़ा संख्येने सहभागी व्हायच्या हे विशेष.

प्रसाद रावकर

prasadraokar@gmail.com

First Published on January 13, 2018 1:16 am

Web Title: old chawl system in mumbai