मीरा रोडच्या सिल्वर पार्क येथे रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. खड्डय़ात बस आदळल्याने तोल जाऊन खाली पडलेल्या ६२ वर्षे वयाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामदेव रामयज्ञ पांडे (रा. कल्याण पूर्व) हे १८ ऑगस्ट रोजी ठाणे ते मीरा रोड या टीएमटी बसमधून प्रवास करीत होते. सिल्वर पार्क येथे रस्त्यावर पडलेले खड्डे व खडीचा ढिगारा असतानाही बसचालक सिद्धेश्वर दगडू मागाडे (ठाणे) हा बस वेगात चालवत होता तेव्हा खड्डय़ात बसचे चाक जाऊन बस जोरात आदळली. या वेळी मागच्या दाराजवळ उभे असलेले पांडे हे तोल जाऊन बसबाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. भक्तिवेदांत रुग्णालयात उपचारांदरम्यान बुधवारी रात्री ते मृत्यू पावले.