मुलुंडच्या गव्हाणपाडा परिसरात एकट्या राहाणाऱ्या वृद्धाची हत्या झाली. सोमवारी संध्याकाळी घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. कैलाशनाथ चौरसीया (६०) असे वृद्धाचे नाव असून नवघर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

चौरसीया गव्हाण पाडा परिसरात पानाची गादी चालवत आणि भाड्याच्या खोलीत एकटेच राहात. सोमवारी संध्याकाळी शेजाऱ्यांना चौरसीया यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले.

पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला कैलाशनाथ यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर धारदार हत्याचाराने अनेक वार केल्याचे आढळले. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.

रविवारी रात्री डी. एन. नगर आणि वसरेवा पोलीस ठाण्यांपासून हाकेच्या अंतरावर राहाणाऱ्या गुलाबी शेट्टी(७५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी गळा आवळून हत्या केली. त्याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस तपास करत आहेत.