वरळीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या वृद्ध मजूर कामगारावर निवृत्तिवेतनासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. जयराम खांबे असे त्यांचे नाव असून गेल्या दहा महिन्यांपासून निवृत्तिवेतनच त्यांना मिळालेले नाही. वरिष्ठांकडे वारंवार विनंत्या व तक्रारी करूनही वेतन न मिळाल्याने हताश होण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाशी चर्चा केल्यावर येत्या काही दिवसांत त्यांचे निवृत्तिवेतन मिळेल असे सांगण्यात आले.
वरळीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून निवृत्त झालेले साठ वर्षीय खांबे आपल्या हक्काच्या निवृत्तिवेतनासाठी सरकार दरबारी चपला झिजवत आहेत. अत्यंत साध्या व छोटय़ा कुटुंबात आपल्या चार जणांच्या कुटुंबासाठी ते एकमेव उत्पन्नाचा स्रोत असल्याने त्यांना निवृत्तिवेतनाची निकड होती. जुलै २०१५मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांना दोन-तीन महिन्यात निवृत्तिवेतन मिळेल अशी आशा होती. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरली. आधीच हृदयविकाराने त्रस्त असलेल्या खांबे यांना आपल्या कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथे राहणाऱ्या खांबे यांनी सांगितले की, निवृत्त झाल्यावर निवृत्तिवेतन मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप हे वेतन न मिळाल्याने माझे व माझ्या कुटुंबाचे हाल झाले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पत्नी घरकाम करत असून मुलाला नुकतीच एक नोकरी लागली आहे. निवृत्तिवेतनासाठी वरळीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील आमच्या कार्यालयात अनेकदा फेऱ्या मारल्या तरी प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, याबाबात वरळीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या सपना कोळी यांना विचारले असता, खांबे यांचे सव्‍‌र्हिस बुक अपूर्ण असल्याने या प्रक्रियेला वेळ लागला. त्यांच्या निवृत्तिवेतनाची फाइल नुकतीच आमच्या उप-विभागीय कार्यालयातून मला मिळाली असून त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येऊन त्यांना येत्या काही दिवसांत निवृत्तिवेतन मिळेल, असे त्या म्हणाल्या. मात्र आपले सव्‍‌र्हिस बुक अपूर्ण नसल्याचा दावा खांबे यांनी केला असून, ऐनवेळी वेगळे कारण सांगितल्याचे खांबे म्हणाले.