गुन्हा केल्याचा कसलाही पुरावा नसताना गेली तब्बल १२ वर्षे एका वृद्धेला तुरुंगात डांबल्याप्रकरणी संताप व्यक्त करीत उच्च न्यायालयाने सरकारला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच सरकारी व बचाव पक्ष, कनिष्ठ न्यायालय आणि विधी साह्य़ समितीनेही आवश्यक ती कायदेशीर दक्षता बाळगली नसल्याबाबत न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. केवळ आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, अशिक्षित असल्याने गुन्हा केला नसताही सरकारी मनमानीचा फटका बसतो व तुरुंगवास भोगावा लागतो हे दु:खद असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
सावित्रीबाई जोगदंड (६१) आणि तिची मुलगी रमा (२९) यांची अर्भकाच्या हत्येप्रकरणातून निर्दोष मुक्तता करताना नागपूर खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. रमा आणि सावित्रीबाईने रमाच्या नवजात बालकाची हत्या केल्याचा आरोप होता. कनिष्ठ न्यायालयाने दोघींना दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. मात्र रमाने रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याचा आणि पैनगंगा नदीकाठी एक मृत अर्भक सापडल्याचा पुरावा वगळता हे अर्भक तिचेच असल्याचे तसेच या दोघींनीच अर्भकाची हत्या केल्याचा कुठलाही पुरावा सरकारी पक्षाने सादर केला नाही. तरीही सत्र न्यायालयाने या दोघींना जन्मठेप सुनावली. एवढेच नव्हे, तर सत्र न्यायालयाने रमाला दोषी ठरवताना तिची तुलना महाभारतातील कुंतीशी केली, हे संतापजनक असल्याचे ताशेरे खंडपीठाने ओढले आहे.
सरकार, खटला चालविणारे न्यायाधीश, सरकारी व बचाव पक्षाचे वकील, स्वयंसेवी संस्था यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले ते संतापजनक आहे, असे न्यायालयाने या दोघींची निर्दोष मुक्तता करताना म्हटले. शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने रमाला मदत केली. त्यानंतर २००६ मध्ये उच्च न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. पण रमासाठी अपील दाखल करणाऱ्या वकिलाने सावित्रीबाई यांच्यासाठी मात्र अपील केले नाही, याबाबतही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

१२ वर्षांची फरफट..
सावित्रीबाई जोगदंड यांची मुलगी रमा हिने एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर पैनगंगा नदीकाठी एक मृत अर्भक सापडले. हे तिचेच अर्भक असून तिने आईच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप ठेवून या दोघींवर खटला भरला गेला. मृत अर्भक आणि या दोघींची डीएनए चाचणीही झाली नाही. कोणताही पुरावा नसताना या दोघींना जन्मठेप झाली. कालांतराने रमाची सुटका झाली, मात्र अशिक्षित सावित्रीबाई तब्बल १२ वर्षे तुरुंगात खितपत होत्या.