घरात एकटय़ा राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची हत्या केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यात इमारतीचा सुरक्षारक्षक, घरगडी आणि गाडी धुणाऱ्या नोकराचा समावेश आहे.
 विमला जैस्वाल (६५) या अंधेरी सात बंगला येथील बीच क्लासिक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहात होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या एकटय़ाच राहात होत्या. २४ एप्रिल रोजी जैस्वाल यांची घरातच अज्ञात इसमाने गळा दाबून हत्या केली होती. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी केवळ चोरण्यात आली होती, पण घरातील अन्य मौल्यवान ऐवज तसाच होता. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी तपास करून सोमवारी याच इमारतीमधील सुरक्षारक्षक संतोष कुमार शर्मा (४२), घरगडी शेरबहादूर साऊद (३२), इमारतीमधील गाडय़ा धुणारा धर्मेश सिंग (३०) यांना अटक केली. त्यांनी चोरीच्या उद्देशाने जैस्वाल यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
..आणि चोरीचा प्रयत्न फसला
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक सुभाष विळे यांनी सांगितले की, जैस्वाल यांची आर्थिक सुस्थिती पाहून या तिघांनी त्यांचे घर लुटण्याची योजना बनविली.
वरच्या मजल्यावरील घराचे कापड तुमच्या खिडकीत पडले आहे, असे सांगून त्यांनी घरात प्रवेश केला होता. घरात घुसताच त्यांनी नाडीने जैस्वाल यांचा गळा आवळला. मात्र  त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इमारतीचा सुरक्षारक्षक घरी आला होता, पण नंतर कुणी दार न उघडल्याने परत गेला. मात्र पण आपण पकडले जाऊ या भीतीने तिन्ही आरोपींनी चोरी अर्धवट सोडून केवळ गळ्यातील सोनसाखळी काढून पळ काढला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमाळे, पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, मिलिंद देसाई आदींच्या पथकाने या आरोपींना अटक केली.