दहिसर पोलिसांनी २८ दिवसांच्या तपासानंतर ९०० किलो टोमॅटो चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (वय ५४) असे त्याचे नाव आहे. तो कुर्ला येथील राहणारा आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. गुप्ता याला मंगळवारी संध्याकाळी कुर्ला येथून ताब्यात घेतले. गुप्ता ‘साई टेम्पो सर्व्हिस’चा मालक असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मालवाहतूक करण्याचे तो काम करतो. २०१५ मध्ये केळीचे ६० क्रेट्स त्याने चोरले होते. या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. तो जामिनावर सुटला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलैला टोमॅटो विक्रेता जगत श्रीवास्तव याने टोमॅटो चोरीची तक्रार दाखल केली होती. दहिसर स्थानकाजवळील अविनाश कम्पाऊंडमधील भाजी बाजारातून ५७ हजार रुपये किंमतीचे टोमॅटोचे क्रेट्स खरेदी केले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. ज्या ठिकाणाहून टोमॅटोची चोरी झाली तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पोलिसांनी तपासले. त्यात चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो दिसला. या टेम्पोवर ‘साई टेम्पो सर्व्हिस’ असा उल्लेख होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी संध्याकाळी या टेम्पोचा मालक गुप्ता याला बेड्या ठोकल्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, अविनाश कम्पाऊंडमधील भाजीबाजारात श्रीवास्तव यांचे दुकान आहे. या दुकानाचे शटर तोडून २५ हजार रुपये किंमतीचे ३०० किलो टोमॅटो चोरीला गेले होते. चोरी झाली त्यावेळी टोमॅटोचा भाव १०० रुपये प्रतिकिलो होता. श्रीवास्तव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र, पोलिसांनी ९०० किलोऐवजी ३०० किलो टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार नोंदवून घेतल्याचा आरोप श्रीवास्तव यांनी केला होता. दरम्यान, गुप्ता याला २०१५ मध्ये चेंबूर पोलिसांनी केळीचे ६० क्रेट्स चोरी केल्याच्या प्रकरणात अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.