ज्यांच्याविरोधात आवाज उठवला त्याच कलानींच्या सुनेला महापौरपदाची उमेदवारी

मुंबई : पक्षविस्तारासाठी अन्य पक्षांतील नेत्यांना लाल गालिचा अंथरण्याची प्रथा भाजपला लाभकारक ठरली खरी, पण त्यामुळे एकेकाळी ज्यांच्याविरोधात आकाशपाताळ एक केले त्यांचाच जयघोष करण्याची पाळी कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवरही आली आहे. उल्हासनगरात सत्तेच्या ‘कलानी’ जाताना हाच अनुभव कार्यकर्त्यांना येत आहे.

१९९०च्या दशकात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून पप्पू कलानीच्या विरोधात भाजप नेत्यांनी आकाश-पाताळ एक केले  होते. त्याच कलानीच्या पुत्राचा भाजपला आता आधार वाटू लागला आहे. कलानीच्या सुनेला भाजपने उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरविले आहे.

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात भाजपने आवाज उठविला होता. याचा भाग म्हणूनच उल्हासनगरच्या पप्पू कलानीच्या विरोधात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जोरदार हल्ला चढविला होता. १९९२ ते १९९५ या काळात मुंडे यांनी सातत्याने कलानीवरून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तसेच काँग्रेसला लक्ष्य केले होते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यासाठी ठाणे जिल्ह्यतील गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यातूनच पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर या आमदारांना ‘टाडा’ कायद्याखाली अटक झाली होती. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुंडे यांनी पप्पू कलानीच्या विरोधात जोरदार मोहीमच उघडली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवात मुंडे यांनी केलेल्या आरोपांचा फायदा झाला होता. १९९०च्या दशकात भाजपने ज्या पप्पू कलानीच्या विरोधात हवा तयार केली वा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कलानी, अशी उपमा दिली, त्याच पप्पू कलानी कुटुंबीयांचा भाजपला आता आधार घ्यावा लागत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत कलानीपुत्राला भाजपमध्ये प्रवेश देण्याचे घाटत होते. पण कलानीपुत्राला पक्षात प्रवेश दिल्यास त्यातून चुकीचा संदेश जाईल, असे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर कलानीपुत्राने स्वतंत्र गट स्थापन करावा आणि मग त्याच्याशी पक्षाने हातमिळवणी करावी, असा मध्यम मार्ग काढण्यात आला. पहिल्या अडीच वर्षांपैकी सव्वा वर्ष महापौरपद आपल्या गटाला मिळावे, अशी कलानीपुत्राची मागणी होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा कलानीपुढे झुकण्यास विरोध होता. पण भाजपचे राज्यस्तरीय नेतृत्व कलानीपुढे झुकले. त्यासाठी पक्षाच्या मिना आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. येत्या शुक्रवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कलानीपुत्राच्या पत्नीस महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. कलानीच्या सुनेला हरविण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडय़ा एकत्र आल्या आहेत.

सारे कलानीमय!

हत्येप्रकरणी कुख्यात पप्पू कलानी हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पण उल्हासनगर शहरावर पप्पूचा प्रभाव आजही कायम असल्याचे स्पष्ट जाणवते. पप्पू कलानीची पत्नी उल्हासनगरची राष्ट्रवादीची आमदार आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून कलानी यांचे भाजपप्रेम वाढले. राष्ट्रवादीच्या आमदार असूनही कलानी यांच्या पत्नीने गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार केला नव्हता. कलानी पुत्राचे भाजपप्रेम वाढल्याने आईने राष्ट्रवादीपासून दूर राहण्यावरच भर दिला होता. पण गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये आमदार ज्योती कलानी यांनाच संधी देण्यात आली. कलानी पुत्राच्या कलानेच भाजपचे नेते सारे निर्णय घेत असल्याचे चित्र दिसते. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही कलानी कुटुंबीयांकडेच पक्षाचे नेतृत्व राहील यावर भर दिला आहे. म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे कलानीमय झाल्याचे जाणवते.

पप्पू कलानीच्या मुलाला पक्षात दिले जाणारे महत्त्व भाजपच्या ठाणे जिल्ह्यतील नेत्यांना अजिबात रुचत नाही. पक्ष वाढीसाठी कलानीच्या मुलाशी समझोता कशाला करायचा, असा सवालही केला जातो. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कलानीला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच महापौरपदासाठी कलानीच्या सुनेला पाठिंबा देण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीतही कलानी कुटुंबीयांपैकी कोणाला तरी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते एवढे कलानीमय झाले आहेत की सरकारी कृपेमुळे पप्पू कलानी तुरुंगाबाहेर आल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपमध्येच उमटते आहे.