16 October 2019

News Flash

कामावर असताना बेस्ट कर्मचाऱ्याला पक्षाघात

रवींद्र वाघमारे  यांना मेंदूचा पक्षाघात झाल्याने अर्धागवायूचा झटका आला.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : देवनार बस डेपो येथे कामावर असताना बेस्टचे वाहक रवींद्र वाघमारे (४२) यांना शुक्रवारी मेंदूचा पक्षाघात झाला असून शरीराची डावी बाजू निकामी झाली आहे. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रवींद्र खारघर येथे राहत असून शुक्रवारी सकाळी साडेतीन वाजता घरातून कामासाठी बाहेर पडले. सकाळी आठच्या सुमारास अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने अकराच्या सुमारास शीव रुग्णालयात नेले.

रवींद्र वाघमारे  यांना मेंदूचा पक्षाघात झाल्याने अर्धागवायूचा झटका आला. यामध्ये त्यांच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला असून तिथल्या संवेदना गेल्या आहेत, अशी माहिती त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

रवींद्र यांना दीड वर्षांची मुलगी असून आम्ही तिघे भाऊ एकत्र राहतो. अद्याप त्याच्या पत्नीला याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे आता घरी काय सांगावे, हेच समजत नाही, असे त्यांचे भाऊ प्रमोद वाघमारे यांनी व्यक्त केले.

केवळ हजेरी 

बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारीही हजेरीच लावण्याचे काम केले.

प्रत्यक्षात बेस्ट गाडय़ा मात्र रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. सकाळी अकरापर्यंत ४,३०२ चालकांपैकी दोन जणांनी हजेरी लावली तर ४,६०८ वाहकांपैकी एकही वाहक उपस्थित राहिला नाही.

२५२ बस निरिक्षकांपैकी ८० हजेरी लावल्याने बेस्ट उपक्रमाने सांगितले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत बसच्या निरिक्षकांची उपस्थिती १०७ पर्यंत वाढली. चालक-वाहकांच्या हजेरीत मात्र बदल झाले नाहीत.

 

‘बेस्ट कर्मचाऱ्यांचा तंटा औद्योगिक लवादाकडे सोपवा’

बेस्ट कर्मचाऱ्यांचा तंटा औद्योगिक विवाद कायद्यातील तरतुदीनुसार लवादाकडे निवाडय़ासाठी सोपवावा व त्यासाठी न्यायालयाच्या न्यायमुर्तीची नेमणुक करून तीन महिन्यात निवाडा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे संघटनेला संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होणे भाग पडेल, असे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले.

First Published on January 12, 2019 1:02 am

Web Title: on duty best employee paralysis attack