मुख्यमंत्री बदलावा कि, बदलू नये या चर्चेत मी पडणार नाही. मराठा आरक्षणा पुरता माझा विषय मर्यादीत आहे. अन्य राजकारणात मी पडणार नाही अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नारायण राणेंनी शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या विषया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणे यांनी संजय राऊत यांना मुख्यमंत्री बदलावर भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला ? असा प्रतिप्रश्न केला. माझा आजचा विषय आरक्षणापुरता मर्यादीत आहे अन्य राजकारणात मी जाणार नाही असे ते म्हणाले. तामिळनाडूत ६९ टक्के आरक्षण आहे. त्याच धर्तीवर आम्ही अहवाल तयार केला होता.

भारतीय घटनेच्या कलम १५,१६ नुसार आरक्षण देणे शक्य आहे असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आधी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास का ठेवावा असा आंदोलकांचा प्रश्न आहे ? त्यावर राणे म्हणाले कि, विश्वास का ठेवावा ?, कसा ठेवावा ? या प्रश्नाला उत्तर नाही पण आंदोलकांनी तुटेपर्यंत रशी खेचू नये असे ते म्हणाले.