लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभं राहून स्टंटबाजी दाखवणाऱ्या पूजा भोसले या तरुणीविरोधात रेल्वे पोलिसांनी कलम १५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करताना थोडक्यात बचावलेल्या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकलमध्ये असणाऱ्या पुरुष प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तरुणीचे प्राण वाचवले अन्यथा तरुणी लोकलखाली आली असती.

पूजा भोसले असं या तरुणीचं नाव आहे. मात्र आपल्या कृत्याबद्दल खंत किंवा पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी तरुणी मुजोरपणा दाखवत ज्याने व्हिडीओ काढला त्याला सोडणार नाही असं म्हटल आहे. अपघात झाला तेव्हा पूजा भोसले दिवा येथे चालली होती. घाटकोपर – विक्रोळी स्थानकांदरम्यान दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करत असताना समोरुन आलेल्या लोकलमुळे तिचा हात सुटला आणि खाली पडली. मात्र पुरुष प्रवाशांनी वेळीच तिचा हात पकडल्याने तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून तिथेच उभा एक प्रवासी हे सगळं शूट करत होता.

पूजा भोसले हिने आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा तिची मुजोरी समोर आली. उद्दामपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्याने माझा व्हिडीओ काढून पसरवला त्याचा पत्ता मला द्या, त्याला सोडणार नाही असं ती म्हणाली. जर तो शूटिंग करु शकत होता, तर मला वाचवू शकत नव्हता का ? असा उलट सवाल तिने विचारला आहे. मी फक्त हात झटकण्याचा प्रयत्न केला आणि पडले…यामध्ये माझी काय चूक आहे ? असं म्हणत तिने आपली काहीच चूक नसल्याचा दावा केला. यावर्षी मध्य रेल्वे मार्गावर पोलिसांनी फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या ४९३ आणि स्टंट दाखवणाऱ्या ६८ जणांविरोधात अटकेची कारवाई केली आहे.