भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या (६ डिसेंबर) मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये १४ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि १२ लोकल गाड्यांचा समावेश आहे. एएनआयने मध्य रेल्वेच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने त्यांचे स्मृतीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर राज्यातील विविध भागातून लाखो आंबेडकरी जनता आणि अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात. त्यामुळे या काळात मुंबईत येणाऱ्या जनतेला गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या या विशेष गाड्या नागपूर, अजनी, सोलापूर, गुलबर्गा आणि इतर ठिकाणांवरुन सोडण्यात येणार आहेत.