घरगुती उत्सवात मातीच्या मूर्तीला प्राधान्य, प्लास्टरचे उत्पादन घटले
शाडूच्या तुलनेत घडविणे आणि हाताळणे सोपे तसेच किंमतीतही निम्म्याने स्वस्त असल्याने गेल्या दोन दशकांत गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये वाढलेला प्लास्टरचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने भलताच महाग ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याने आता पुन्हा एकदा शाडूच्या गणेश मूर्तीची मागणी वाढू लागली आहे. गणेशमूर्ती घडविण्याचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे केंद्र मानल्या जाणाऱ्या पेणमधील कारखान्यांमध्येही आता प्लास्टरच्या बरोबरीनेच शाडूच्या मूर्तीही तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. कल्याणमधील कुंभारवाडय़ात पांडुरंग गवाणकर यांनी तर यंदा तब्बल पाच फूट उंचीच्या शाडूच्या मूर्ती साकारल्या आहेत.   
नागरिकांना पर्यावरण स्नेही विचारांचे महत्त्व पटू लागल्याने प्लास्टरच्या तुलनेत किंमत दुप्पट असूनही गेली काही वर्षे शाडूच्या मूर्तीना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबई- ठाणे परिसरातील अनेक विक्री केंद्रांनी यंदा मोठय़ा प्रमाणात शाडूच्या मूर्ती मागविल्या आहेत. पेण येथील मूर्तीकार सुभाष कुंभार यांच्या गौरी कला केंद्रातून गेल्या वर्षी शाडूच्या ४०० मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने तब्बल ९०० मातीच्या मूर्ती घडविण्यात आल्या. विशेष म्हणजे मोठय़ा प्रमाणात शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साचेही आता उपलब्ध होऊ लागले आहेत. घरगुती उत्सवांमध्ये मातीच्या मूर्तीना प्राधान्य दिले जाऊ लागले असले तरी अजूनही
सार्वजनिक उत्सवांमध्ये मात्र प्लास्टरचाच वापर अधिक प्रमाणात होत आहे.

शाडू कलावंतांना तारक..
कारागीर बेकार होतील, असा युक्तीवाद प्लास्टरबंदीचे विरोधक करीत असले तरी त्यात फारसे तथ्य नाही. उलट शाडूची मूर्ती घडविण्यातून मूर्तिकारांच्या हाती जास्त पैसे येतील, शिवाय वर्षभर काम उपलब्ध होऊन जीवनात स्थैर्य येईल, असे काही मूर्तिकारांचे म्हणणे आहे. अंबरनाथ येथील मूर्तीकार नाना कडू यांनी त्यांच्या कारखान्यात यंदा ७५ शाडूच्या मूर्ती घडविल्या. अजूनही त्यांच्याकडे शाडूच्या मूर्तींसाठी ग्राहक येत आहेत. मात्र वेळेअभावी त्यांना ते करणे शक्य नाही. गेल्या वर्षी त्यांनी ४५ शाडूच्या मूर्ती घडविल्या होत्या. ग्राहकांनी वेळेत आपली मागणी नोंदवली, तर वर्षभर काम करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या शाडूच्या मूर्ती विरघळल्यानंतर त्या मातीचा पुनर्वापरही करणे शक्य आहे.
कारखानदार मात्र विरोधातच
व्यवसायाच्या दृष्टीने प्लास्टरची मूर्ती सोयीची असल्याने अनेक कारखानदार मात्र अजूनही शाडूच्या मूर्तीच्या विरोधात आहेत. कारण शाडूची मूर्ती व्यवस्थित हाताळावी लागते. ती प्लास्टरपेक्षा केवळ महागच नव्हे तर वजनानेही जड असते. त्यामुळे अर्थातच वाहून नेण्यासाठीही अधिक कष्ट पडतात़